डायलीसिसची सुविधा आठवड्यातून तीन वेळा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:12 PM2018-09-11T22:12:56+5:302018-09-11T22:13:17+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आठवड्यातून तीन वेळा डायलीसिसची सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन युथ पँथर्स युवा सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे यांच्या नेतृत्वात आ. रामचंद्र अवसरे यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आठवड्यातून तीन वेळा डायलीसिसची सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन युथ पँथर्स युवा सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे यांच्या नेतृत्वात आ. रामचंद्र अवसरे यांना देण्यात आले.
वैद्यक शास्त्रानुसार किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी आठवड्यातून किमान तीनवेळा (१२ तास) डायलेसिस करणे आवश्यक असते. परंतु जिल्हा समान्य रुग्णालय भंडारा येथे डायलेसिसची सुविधा रुग्णांना आठवड्यातून फक्त दोनचं वेळा देण्यात येत आहे. वैद्यक शास्त्रानुसार असे करणे म्हणजे रुग्णांच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक आहे. सुरुवातीला जिल्हा सामन्य रुग्णालयात आठवड्यातून तीन वेळा डायलेसिसची सुविधा उपलब्ध होती परंतु रुग्णालय प्रशासनाने आर्थिक कारण समोर करून डायलेसिस विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पदावरून कमी केल्यामुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी आता मात्र ही डायलेसिसची सुविधा आठवड्यातून दोनच वेळा देण्यात येत आहे. परिणामी मागील आठवड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात किडनीच्या रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा डायलेसिसची सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे तब्बल सहा रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
सामान्य रुग्णालयातील डायलेसिस विभागाला पुरेशा मनुष्यबळाचा पुरवठा करून डायलेसिसची सुविधा पूर्वीप्रमाणेच आठवड्यातून तीन वेळा उपलब्ध करण्यात यावी अन्यथा युथ पँथर्स युवा समाजिक संघटना संपूर्ण जिल्ह्यात भीक मांगो आंदोलन करून प्राप्त झालेल्या निधीतून स्वत; डायलेसिस विभागाला मनुष्यबळाचा पुरवठा करून डायलेसिस सुविधा पूर्वपदावर आणेल. अशा आशयाचे एक लेखी निवेदन युथ पँथर्स युवा सामाजिक संघटनेच्या वतीने भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे, उपाध्यक्ष मोरेश्वर राऊत, जिल्हाध्यक्ष राहुल बांते, महासचिव ऊमेश सरदार, शहराध्यक्ष दिनेश मेश्राम, शहर सरचिटणीस सुधीर फुलबांधे, महिलाध्यक्षा रंजना मोरे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रज्जत खोब्रागडे, विभागीय अध्यक्ष सत्यपाल मोरे, राहुल ठाकरे, राष्ट्रपाल मोरे, पुस्तकला भेदे, प्रदीप रामटेके, राकेश बांते, प्रशांत बोरकर आदींचा समावेश आहे.