कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसांना आर्थिक लाभासह नोकरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:44 AM2021-07-07T04:44:13+5:302021-07-07T04:44:13+5:30
भंडारा : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना आजाराने मृत्यू झाला. ...
भंडारा : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना आजाराने मृत्यू झाला. महामारीत कर्तव्य बजावताना शिक्षकांचा जीव गेला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरीत सामावून घ्यावे तसेच कुटुंबातील सदस्यांना ५० लाखांचे अनुदान द्यावे. या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाने पीडित कुटुंबातील सदस्यांसोबत ५ जुलै रोजी नागपूरचे शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच दिनांक ६ जुलै रोजी पंचायत समिती, तुमसरचे गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची पूर्वनोटीस देऊनही ऐनवेळी गटशिक्षणाधिकारी विजय आदमने गैरहजर होते. त्यामुळे पंचायत समितीचे बीडीओ धीरज पाटील यांनी निवेदन स्वीकारून संघटनेच्या सदस्यांसोबत सकारात्मक चर्चा केली.
राज्यातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यासह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थान यंत्रणेमार्फत शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या सेवा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहीत करण्यात आल्या. त्यामुळे आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या पथकामध्ये शिक्षकांनीही कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावले. यात अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण होऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे जीव गेले आहेत.
त्यामुळे मृत शिक्षकांच्या कुटुंबाना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असून, कुटुंबातील कमावती व्यक्ती कोरोनासारख्या आजाराने दगावल्यामुळे वडीलधाऱ्या मंडळींचे औषधोपचार, कुटुंबाचे संगोपन, शाळकरी मुलांचे शिक्षण, मुला-मुलींचे लग्न समारंभ तसेच इतर दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, हा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतरांच्या कुटुंबाला ५० लाखाचे अनुदान देऊन त्यांच्या वारसाना अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाने ५ जुलै रोजी नागपूरचे शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच ६ जुलै रोजी तुमसरचे गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दुपारी २ ते ३ या कालावधीत कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबासह धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले. गैरहजर असलेल्या गटशिक्षणाधिकारी यांचा निषेध नोंदवून बीडीओ यांना निवेदन दिले.
निवेदन देतेवेळी खासगी प्राथमिक शिक्षक संघांचे प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, लोकपाल चापले, अरुण मोखारे, जयंत पंचबुधे, अशद शेख, प्रेमलाल मलेवार, विलास खोब्रागडे, कुणाल जाधव, जयगणेश पटले, गीतेश्वरी रहांगडाले, प्रभू ठाकरे, जयंत परतेकी, सेवाकराम शरणगात, रमेश कहळकर, विजयमाला शेंडे, माया मोहतुरे, सुषमा डोंगरे, भाग्यश्री निखाडे, अनिता सिंधपुरे तसेच पीडित कुटुंबातील सदस्य हितेश कढव, रहांगडाले इत्यादी मोठया संख्येने उपस्थित होते,