शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
By admin | Published: April 16, 2017 12:14 AM2017-04-16T00:14:58+5:302017-04-16T00:14:58+5:30
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही.
उन्हातही शेतकरी सहभागी : आझाद शेतकरी संघटनेचा पवनीत बैलबंडी मोर्चा
पवनी : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी कर्जमाफी हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतकरी मोर्चाचे आयोजक आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केले.
आझाद शेतकरी संघटनेच्या वतीने सिंदपुरी टी-पॉर्इंटवरून शेतकरी मोर्चा काढण्यात आलेला होता. बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी व जीपगाड्यासह शेतकरी मोर्चात सहभागी झाले. पवनी नगरातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचला. मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. सभेत पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, टिंकू तिघरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त करण्यात आले. केंद्रात व राज्यात असलेल्या भाजपा सरकारने उत्तरप्रदेशात कर्जमाफीची घोषणा करून कर्जमाफी दिली. महाराष्ट्रात ती का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला. आझाद शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार एस.के. वासनिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर गीते उपस्थित होते.
शासनाने शेतकऱ्यांचे सातबारा वरील कर्ज माफ करावे, गोसे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, खते व बि बियाणे ५० टक्के सवलतीवर उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा, डाव्या कालव्याच्या लघु वितरिकांचे काम करून चौरास वाळवंट होण्यापासून थांबवावे, नेरला उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, खापरी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना पेंशन योजना सुरु करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)