दूध विक्रेत्यांना रेल्वेत स्वतंत्र डबा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:07 AM2019-07-13T01:07:16+5:302019-07-13T01:08:03+5:30
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरुण शेतकरी दूध व्यवसायात आहेत. रेल्वे मार्गाने दुधाची वाहतूक करून नागपूर येथे दुधाची विक्री केली जाते. त्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देण्याची मागणी दूध विक्रेत्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरुण शेतकरी दूध व्यवसायात आहेत. रेल्वे मार्गाने दुधाची वाहतूक करून नागपूर येथे दुधाची विक्री केली जाते. त्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देण्याची मागणी दूध विक्रेत्यांनी केली आहे. एका निवेदन माजी खासदार शिशुपाल पटले यांना देण्यात आले. त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील विशेषत: तुमसर, तिरोडा तालुक्यातील ५०० च्या वर शेतकऱ्यांची तरुण मुले नागपूरला जाऊन दूध विक्रीचा व्यवसाय करतात. नोकरीच्या मागे न लागता या तरुण शेतकऱ्यांनी स्वयंरोजगार स्वीकारला आहे, मात्र रेल्वेने दुधाची वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन २००५ मध्ये माजी खासदार शिशुपाल पटले यांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा लावण्याची व्यवस्था करवून घेतली होती. मधल्या काळात हा डबा बंद करण्यात आल्यानंतर शिशुपाल पटले यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन पुन्हा हा डब्बा पूर्ववत सुरू केला.
दुधाला दोन पैसे अधिक जादा दर मिळत असल्यामुळे दूध विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. एका डब्यात दूध वाहून नेणे शक्य होत नाही. त्यामुळे दुसरा वाढीव डबा लावून देण्याची दूध विक्रेत्यांची मागणी आहे. या मागणीचे निवेदन दूध विक्रेत्यांनी शिशुपाल पटले यांना दिले. पटले स्वत: शेतकरी आहेत. त्यांना शेतकºयांच्या प्रश्नांची अधिक जाणीव आहे. त्यामुळे ही मागणी त्यांच्याकडेच करण्यात आली असल्याचे दूध विक्रेत्यांनी सांगितले. या दूध विक्रेत्यांना लवकरच दुसरा डब्बा लावून देण्याचे आश्वासन शिशुपाल पटले यांनी दिले असून तातडीने डी.आर.एम व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन मागणी पूर्ण करून देणार असल्याचे पटले यांनी सांगितले.
मागणीची पूर्तता केव्हा होणार, याकडे आता दूध विक्रत्यांचे लक्ष लागले आहे.