बिल असेल तरच रुग्णाला रेमडेसिविर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:27 AM2021-04-29T04:27:43+5:302021-04-29T04:27:43+5:30
भंडारा : सर्वत्र रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असून रुग्णांचे नातेवाइक कुठूनतरी इंजेक्शन आणतात आणि डाॅक्टर ते टोचून देतात. काळाबाजार ...
भंडारा : सर्वत्र रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असून रुग्णांचे नातेवाइक कुठूनतरी इंजेक्शन आणतात आणि डाॅक्टर ते टोचून देतात. काळाबाजार टाळण्यासाठी अहमदनगर पॅटर्न प्रमाणे इंजेक्शनचे बिल असेल तरच रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन लावा असे आवाहन भंडारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ .नितीन तुरस्कर यांनी डाॅक्टरांना केले आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनसाठी प्रपत्र ब भरावे लागते. त्यावर रुग्णाचे सर्व डिटेल्स लिहावे लागतात. कोविड सेंटरचे प्रभारी डाॅक्टर जिल्हाधिकाऱ्यांना ते सादर करतात. परंतु अलीकडे रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे सर्वांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे डाॅक्टर रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन लिहून देतात. परंतु बाजारात कुठेही मिळत नाही. त्यामुळे मग ही मंडळी काळ्याबाजारात इंजेक्शनचा शोध घेतात. अव्वाच्या सव्वा पैसे देऊन इंजेक्शन मिळवितात आणि रुग्णाला देतात. रेमडेसिविरचा काळाबाजार टाळायचा असेल तर अहमदनगर पॅटर्न प्रमाणे बिल असेल तरच रेमडेसिविर इंजेक्शन लावा. बिल नसलेले रेमडेसिविर इंजेक्शन टोचू नका असे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डाॅ. तुरस्कर यांनी केले आहे. डाॅक्टरांच्या सकारात्मक प्रतिसादाची आयएमएला प्रतीक्षा आहे.