आधी कायमस्वरूपी शिक्षक द्या, नंतर शाळा सुरू करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:32 AM2021-07-26T04:32:33+5:302021-07-26T04:32:33+5:30
करडी ही परिसरातील सर्वाधिक लोकसंख्येची व्यापारी पेठ आहे. करडीत जिल्हा परिषदेची १ ते ४ व ५ ते १२ पर्यंतची ...
करडी ही परिसरातील सर्वाधिक लोकसंख्येची व्यापारी पेठ आहे. करडीत जिल्हा परिषदेची १ ते ४ व ५ ते १२ पर्यंतची शाळा असून कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान विषयाचे विद्यादान दिले जाते. परंतु चार वर्षांपासून इथे शिक्षकाचा तुटवडा आहे. ५ ते १२ पर्यंत एकूण १२ पदसंख्या मंजूर असताना केवळ ४ शिक्षक कार्यरत आहेत. कनिष्ठ महाविद्यालय तासिका शिक्षकांचे भरवशावर चालविणे असल्याने नाईलाजाने का होईना विद्यार्थी व पालकांचा कल खाजगी शाळांकडे वळू लागला आहे. शाळेचे सत्र सुरू झाले की, दरवर्षी शिक्षक द्या, अशी मागणी केली जाते. पण, हो पाहू, असे बोलून शिक्षण विभाग डोळेझाक करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरत आहे.
गेल्या सत्रापासून कोरोना महामारीने शिक्षणाची वाट लावली. अशातच आता राज्य शासनाने गाव पातळीवर पालक व शाळेच्या समन्वयाने शाळा सुरू करता येईल, असा आदेश दिल्याने परिसरातील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. नुकतीच १५ जुलै रोजी करडी येथे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शाळा व्यवस्थापन समितीची पालकांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. त्यावेळी शिक्षकांचा तुटवडा हा प्रश्न पुढे आला. तेव्हा सर्वानुमते आधी शिक्षक द्या, नंतरच शाळा सुरू करा, असा ठराव पारित करण्यात आला.
बॉक्स
करडी परिसरात शिक्षणाचा बट्ट्याबोळ
करडी परिसरातील सर्वच शाळांत शिक्षकांची कमतरता असल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. मागील ५-६ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. वर्षाला अनेक शिक्षक सेवानिवृत होतात. विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे. गेल्या चार वर्षापासून करडी येथील शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. महाविद्यालयीन वर्ग तासिका शिक्षकांकडून सुरू आहेत. तेव्हा मागणी रास्त असली तरी शिक्षक मिळणार काय, हा यक्षप्रश्न आहे.
कायमस्वरूपी शिक्षक द्या -शाळा समिती
करडी शिक्षणाचे माहेरघर आहे. परिसरातील प्रत्येक गावातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. परंतु करडी जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभारी आहे. १० शिक्षकांचा तुटवडा आहे. तेव्हा प्रशासनाने विद्यार्थी व पालकांचे हित लक्षात घेता कायम स्वरूपी शिक्षकांची पूर्तता करावी, अशी मागणी शाळा कमिटीचे अध्यक्ष मंगेश साठवणे, मोहन किरणापुर, सूर्यभान बुरडे, राजू शहारे, नथू फाय, बासुदेव डोहळे, मोरेश्वर जगनीत आदींनी केली आहे.