पर्यटन विकासाला प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:34 PM2019-07-16T23:34:13+5:302019-07-16T23:34:27+5:30
पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी रावणवाडी येथे बोटिंगचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, तसेच साकोली येथील तलावांचे खोलीकरण व सौदर्यीकरण, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये निधीची तरतूद करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी रावणवाडी येथे बोटिंगचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, तसेच साकोली येथील तलावांचे खोलीकरण व सौदर्यीकरण, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये निधीची तरतूद करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, सहायक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे व इतर अधिकारी उपस्थित होते. सन २०१८-१९ मध्ये खर्चित व अखर्चित निधी सन २०१९-२० मध्ये प्रस्तावित कामांचा समावेश करण्यात यावा. तसेच प्रत्येक विभागातून प्रस्तावित कामांची यादी सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना निर्देश दिले. जिल्हा क्रिडा संकुलाच्या विकासासाठी पुरेशा निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमध्ये करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रमुख खनिजाच्या स्वामित्व धनाच्या निधीमधून पिण्याचा पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पुल, नाली व पर्यावरण आदी विकास कामांसाठी १९ कोटी ६८ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून विकास कामांना सुरुवात झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आगामी काळात खनिज निधी मधून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणारे उपक्रम राबविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.भंडारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून वन विभागाने ईको-टूरिझमला प्राधान्य द्यावे. रावणवाडी येथे बोटींगचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. त्याचप्रमाणे अॅडव्हेंचर स्पोर्टला चालना द्यावी, असेही पालकमंत्री यांनी सांगितले. पर्यटनासाठी प्राप्त निधीमधून या बाबी त्वरीत करण्यात याव्या, असे ते म्हणाले. साकोली येथील तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करुन लवकरात लवकर कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.