शुद्ध पाणी द्या, अन्यथा स्वतः कर भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:37 AM2021-09-26T04:37:55+5:302021-09-26T04:37:55+5:30
अड्याळ : ग्रामवासी दरवर्षी पाणीपट्टी कर भरतात; पण ग्रामपंचायत प्रशासनाला गत पंधरा वर्षांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देता ...
अड्याळ : ग्रामवासी दरवर्षी पाणीपट्टी कर भरतात; पण ग्रामपंचायत प्रशासनाला गत पंधरा वर्षांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देता आली नाही. आधी शुद्ध पाण्याची व्यवस्था करा, नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी स्वत: भरावी असा आक्रमक पवित्रा अड्याळ ग्रामवासीयांनी घेतला आहे.
दुसरीकडे ज्या नळ योजनेसाठी लाखो रुपये शासनाने खर्च केेले त्याचा अजूनही उपयोग ग्रामस्थांना झालेला नाही.
गावात एकदा सोडून दोन वेळा नळ योजनेची कामे केली गेली; पण त्याचा लाभ ग्रामस्थांना न होता त्या कामात जे होते त्यांनाच मोठ्या प्रमाणात लाभ झाला असल्याचे बोलले जात आहे.
मागील काळात रस्ते, नाली फोडून नळ योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली. त्याआधी काही वर्षे आधीसुध्दा नळ योजनेच्या पाइपलाइनची लाखो रुपयांची कामे करण्यात आली होती खरी. पण शासनाने दिलेल्या लाखो रुपये निधीचा उपयोग ग्रामस्थांना होतो आहे का याचाही विचार जिल्हा प्रशासनाने तथा ग्रामपंचायत प्रशासनाने करायला नको का, असाही सवाल आज उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या निधीचा ग्रामस्थांच्या हितासाठी उपयोग होत असेल तर कुणीही काही बोलणार नाही; पण त्या निधीचा गैरवापर होत असेल तर मग काय करायचं, कुणाला दोष द्यायचा? अड्याळमध्ये राजकीय दृष्टीने मोठी नेते मंडळी अधिकारी वर्षातून अनेकदा भेट देत असतात, पण गावातील सध्याच्या परिस्थितीत एक ना धड भाराभर चिंध्या पाहायला मिळत आहे, गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रोश करीत आहेत मात्र यावर कुणीही बोलायला तयार नाही. याचाही विचार आज जिल्हा तथा ग्रामपंचायत प्रशासनाने करणे गरजेचे नाही का? कारण पाणीपट्टी भरूनही घोटभर शुद्ध पाणी प्यायला मिळत नसेल तर यापेक्षा शोकांतिका दुसरी काय?