बीओटी तत्त्वावरील दुकान गाळे फुटपाथ दुकानदारांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:32 AM2021-07-26T04:32:00+5:302021-07-26T04:32:00+5:30
भंडारा शहरातील गरीब दुकानदार २५ वर्षांपासून फुटपाथवर रोजगार करून कुटुंबाची उपजीविका चालवितात. त्यांच्या पर्यायी व्यवस्थेकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र ...
भंडारा शहरातील गरीब दुकानदार २५ वर्षांपासून फुटपाथवर रोजगार करून कुटुंबाची उपजीविका चालवितात. त्यांच्या पर्यायी व्यवस्थेकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने सन २००९ मध्ये शासन नियम तयार केले. त्यानंतर त्या शासन नियमांचा आधार घेऊन महाराष्ट्र शासनाने सन २०१३ मध्ये शासन नियम काढले. त्या शासन नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे या गरीब फुटपाथ दुकानदारांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. शहरातील लालबहादूर शास्त्री शाळेच्या पटांगणात अनेक झाडे लावलेली आहेत. त्याठिकाणी मोठे गाळे काढल्यास त्या संपूर्ण झाडांची कत्तल करण्यात येईल. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, तसेच लालबहादूर शास्त्री शाळा ही ऐतिहासिक इंग्रजकालीन आहे. त्या शाळेला मुलांना खेळण्याकरिता पटांगण मोकळे आहे. त्याठिकाणी मोठमोठे गाळे तयार केल्यास मुलांना खेळण्याकरिता पटांगण राहणार नाही. सामाजिक कार्यक्रम घेण्याकरिता जागा राहणार नाही. आजपर्यंत श्रीमंत लोकांनीच प्रशासनाला हाताशी घेऊन भंडारा शहरातील ऐतिहासिक व शासकीय जागा काबीज केल्या आहेत. त्यामुळे त्या परिसरात फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या गरिबांवर अन्याय झाल्यामुळे ते बेरोजगार झालेले आहेत. त्यामुळे शासन नियमाचा आधार घेऊन छोटे-छोटे १० बाय १० चे गाळे काढल्यास गरिबांना रोजगार मिळेल व शाळेला पटांगण राहील. शहरातील फुटपाथ दुकानदारांना छोटे गाळे काढून द्यावे; अन्यथा त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत सामावून घेऊन त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी भुरे यांनी निवेदनातून केली आहे.