‘त्या’ महिलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:31+5:302021-07-02T04:24:31+5:30
पवनी : घरातील कर्ता माणूस कोरोनाने हिरावून गेल्याने काही महिलांचे कुंकू पुसले गेले. त्यांचे संसार उघड्यावर पडले असून, कोरोनाच्या ...
पवनी : घरातील कर्ता माणूस कोरोनाने हिरावून गेल्याने काही महिलांचे कुंकू पुसले गेले. त्यांचे संसार उघड्यावर पडले असून, कोरोनाच्या कहरामुळे आर्थिक, मानसिक झळ सर्वांनाच बसली आहे. चालती, फिरती, बोलती माणसे कोरोनाने हिरावून नेली आहेत. यातच आयुष्याचा जोडीदार गमावल्याने महिलांचे दुःख सांगून समजत नाही, अशा महिलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ द्या, अशी मागणी अखिल मुंडले यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्या कुटुंबीयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबीयांचा दैनंदिन जीवनक्रम सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेक आव्हाने निर्माण होत आहेत.
त्या विधवा महिलांचे काय? विधवा महिलांच्या पुढच्या आयुष्याचे काय? याचे उत्तर शासकीय यंत्रणेकडे नाही. सध्या तरी राज्य शासनाने आई- वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांसाठी बालसंगोपन योजना राबवताना पाच लाखांपर्यंत मदत जाहीर केली आहे. मात्र, कोरोनाने पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांसाठी महिला व बालकल्याण विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना जाहीर केली नाही. संजय गांधी किंवा राष्ट्रीय कुटुंब कल्याण या योजनेशी जोडायचे झाले तरी ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी आहेत. त्यामुळे या महिला निकषात बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या विधवा महिलांचे संसार उघड्यावर राहतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे सर्व समाजहित लक्षात घेऊन अखिल मुंडले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.