आधी पाणसारा द्या, मग उन्हाळी पीक घ्या; भंडारा जिल्ह्यात इटियाडोह पाटबंधारे विभागाचा फतवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 12:51 PM2020-12-09T12:51:58+5:302020-12-09T12:52:24+5:30
Bhandara news agriculture शेतक-यांकडे सुमारे दोन कोटी रु.चा पाणसारा थकित असल्याने सदर पाणसा-याची रक्कम वसुलीसाठी पाणसारा द्या उन्हाळी घ्या असा फतवा बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत काढण्यात आल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: इटियाडोह धरण लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांतर्गत शेतक-यांकडे सुमारे दोन कोटी रु.चा पाणसारा थकित असल्याने सदर पाणसा-याची रक्कम वसुलीसाठी पाणसारा द्या उन्हाळी घ्या असा फतवा बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत काढण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत लाखांदूर तालुक्यातील जवळपास साडेचार हजार हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात येते.सदर लाभक्षेत्रांतर्गत तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी शेतक-यांना शेतिपिकासाठी उपलब्ध करता यावे म्हणून या विभागांतर्गत तालुक्यात जवळपास 14 पाणी वापर संस्था कार्यरत असल्याची माहिती आहे.
या संस्थेन्तर्गत लाभक्षेत्रातील शेतक-यांकडून नियमित पाणसारा वसुलीचे अधिकार सबंधित संस्थेला देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाउस झाल्याने धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने यंदा लाखांदूर तालुक्यात या धरणांतर्गत उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेता येण्याची शक्यता आहे.मात्र तालुक्यातील इटियाडोह लाभक्षेत्रात येना-या काही पाणी वापर संस्थांतर्गत पाणसा-याचा भरणा न करण्यात आल्याने या विभागांतर्गत शेतक-यांना पाणसारा भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
सध्या या आवाहनानुसार तालुक्यात सुमारे दोन कोटी रु.चा पाणसारा थकित असुन थकितदार संस्था व शेतक-यांनी येत्या 15 डिसेंबरपर्यंत पाणसारा भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि यंदाच्या खरिपात लागवडीखालील पिकांवर मोठ्या प्रमाणात किडरोग व तुडतुड्याचा प्रादूर्भाव होतांनाच परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होउन शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची बोंब आहे. यासबंध परिस्थितीत शेतक-यांना पुरेशा प्रमाणात पाणसा-याचा भरणा करणे अशक्यप्राय ठरणार असल्याचे देखील बोलल्या जात आहे.
दरम्यान, यासबंधाने अधिक माहिती घेतली असता तालुक्यातील जवळपास अकरा पाणी वापर संस्थांतर्गत पुरेशा प्रमाणात पाणसा-याचा भरणा केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र येत्या उन्हाळी हंगामात या धरणाच्या लाभक्षेत्रांतर्गत उन्हाळी धान पिकाची लागवड व उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांनी पाणसारा भरावा असे आवाहन केले आहे.