गणेशपूरच्या पोळ्यात महानायकाच्या ‘दरवाजा बंदची’ झलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:25 PM2017-08-22T23:25:02+5:302017-08-22T23:25:32+5:30
२ आॅक्टोबर २०१४ ला सुरुवात करून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रम गावागावात रूजविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुद्द पुढाकार घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : २ आॅक्टोबर २०१४ ला सुरुवात करून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रम गावागावात रूजविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुद्द पुढाकार घेतला. या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन केले. त्याचाच प्रत्यय ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या स्वच्छतेच्या सार्वजनिक कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे.
स्वच्छता हा मुद्दा सामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्याने गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कार्यक्रमाला पाठबळ मिळाला आहे. पण यात जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मागे राहिलेला नाही, काल सोमवारी पार पडलेल्या बैलांच्या पोळा सणात शेतकºयांनी बैलांना आकर्षक पद्धतीने सजावट करून सहभाग दर्शविला. यात महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘दरवाजा बंद’ तो बिमारी बंद या जनजागृती मोहिमेची झलक पहायला मिळाली. गणेशपूर ग्रामपंचायतच्या पुढाकाराने आयोजित बैलपोळ्यात सहभागी झालेल्या बैलजोडी मालकांनी यावेळी शासकीय विविध योजनांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
गणेशपूर ग्रामपंचायतच्यावतीने दरवर्षी मिशन हायस्कुलच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पोळ्याचे आयोजन करण्यात येते. सोमवारला बैलांचा पोळा सण उत्साहात पार पडला. यावेळी गणेशपूरसह भंडारा येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
दरवर्षीच्या तुलनेत यावेळी पोळ्यात बैलांच्या जोड्यांची संख्या कमालीची कमी दिसून आली असली तरी ज्या बैलजोड्या पोळ्यात सहभागी झाल्या होत्या त्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. जे शेतकरी बैलजोड्या घेऊन पोळ्यात सहभागी झाले होते त्यांच्या बैलजोड्या विविध आकर्षक पद्धतीने समजविण्यात आलेल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांची माहिती सजावटीच्या माध्यमातून अधोरेखीत करण्यात आली होती.
त्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या शौचालयाच्या वापरासाठी दरवाजा बंद तो बिमारी बंद, बेटी बचाओ, बेटी पढाओ, जलयुक्त शिवार, शेतक२ी आत्महत्या रोखण्यासंदर्भात उपाय योजना, स्वदेशी अपनाओ देश बचाओ, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासोबत देशाच्या सीमेवरील तणावाच्या स्थितीचे व सैनिकांचे मनोबल वाढविण्याबाबत दृश्य साकारण्यात आले होते. एकंदरीत शासकीय योजनांच्या जनजागृतीची झलक बैलांच्या पोळा सणात नागरिकांना अनुभवता आली. विविध सजावटीने लक्ष वेधून घेणाºया बैलजोड्यांना पहायला नागरिकांची चांगलीच रिघ लागली होती. अनेक जण बैलांवरीलसजावटीचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध करण्यासाठी चढाओढ लागली होती. तर अनेकांना सोशल मिडीयावर विविध चित्र पोस्ट करून जनजागृतीची व्याप्ती वाढवित असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त गावाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प झालेला आहे. बैलांच्या पोळा सणातून शेतकरी मोठ्या प्रमाणात हागणदारीमुक्त गाव प्रक्रियेची जागृती करून नागरिकांनी शौचालय बांधकाम करून वापर करावा व ज्यांनी बांधकाम केले आहे त्यांनी वापर व स्वच्छता पाळावी असा सामाजिक संदेश पोहचवून महाराष्ट्र हागदारीमुक्त करण्याच्या संकल्पनेला मजबूत करीत असल्याचे दिसून येत आहे.