केवळ १३ गावांत शौचालय बांधणीची लक्ष्यपूर्ती
By admin | Published: April 18, 2015 12:18 AM2015-04-18T00:18:07+5:302015-04-18T00:18:07+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक गाव निर्मलग्राम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शौचालय बांधण्याचा ध्यास घेतला.
जनजागृती ठरली प्रभावी सर्वाधिक शौचालये तुमसर तालुक्यात, टक्केवारीत लाखनी तालुका अव्वल
प्रशांत देसाई भंडारा
जिल्ह्यातील प्रत्येक गाव निर्मलग्राम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शौचालय बांधण्याचा ध्यास घेतला. ही चळवळ म्हणून स्वत: सीईओंनी पुढाकार घेतला. आजघडीला भंडारा जिल्ह्यात १३ गावांमध्ये १०० टक्के शौचालय बांधणी पुर्णत्वास आली आहे. १४,६६१ या उद्दिष्टांपैकी ११,४३० लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम झाले आहे. आता ज्याठिकाणी उद्दिष्ठ पूर्ण झालेले नाही त्या गावावर भर देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात आजही उघड्यावर शौचालयाला जाण्याचा प्रकार सुरू आहे. कुणी पाण्याची टंचाई सांगतो तर कुणी शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगत आहे. दरम्यान, शासनाने प्रत्येक बीपीएल आणि एपीएलमधील अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक, भूमिहीन मजूर, अपंग, महिला कुटुंबप्रमुखांना १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान उपलब्ध करून दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ कक्षाद्वारे त्याचे नियोजन करून गावागावांत जनजागृती, कार्यशाळा, बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे अनेकांनी शौचालय बांधकामासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे तालुकानिहाय विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे शौचालय बांधकामाला गती मिळाली.
जिल्ह्यात तालुकानिहाय क्रमवारीत तुमसर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल तीन हजार शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहेत. त्यांनतर लाखनी व साकोलीचा क्रमांक लागतो. आजघडीला जिल्ह्यातील ११,४३० लाभार्थ्यांनी शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. उद्दिष्टापैकी ३,२३१ शौचालय बांधकाम होऊ शकले नाही. लाभार्थ्यांना कोट्यावधींचे प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात मागीलवर्षीचा काही निधी आणि यावर्षीचा काही निधीचा समावेश आहे. हा निधी पंचायत समितीनिहाय वाटप करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यात १४,६६१ शौचालय बांधावयाचे उद्दिष्ट होते. त्यात बीपीएल लाभार्थी ६,११४ तर एपीएल लाभार्थी ८,५४७ असे उद्दिष्ट होते. यात ११,४३० शौचालयाची बांधकाम करण्यात आले. त्यात बीपीएल लाभार्थी ५,०६३ तर एपीएल ६,३३७ लाभार्थ्यांचा समावेश आहे. उद्दिष्टाची टक्केवारी ७७.९६ एवढी होते.
११,४३० लाभार्थ्यांनी बांधली शौचालये
भंडारा तालुक्यातील हत्तीडोई, लावेश्वर, सरपेवाडा, टाकळी. मोहाडी तालुक्यातील भिकारखेडा आणि भोसा टाकळी. तुमसर तालुक्यातील धनेगाव, देवरीदेव, बिनाखी, रेंगेपांगरा, तामसवाडी. लाखनी तालुक्यातील निलागोंदी व परसोडी या १३ गावांतील नागरिकांनी शौचालय बांधकामात पुढाकार घेतला आहे.
महिलांचा सक्रिय सहभाग
ग्रामीण भागात आजही आरोग्याच्या बाबतीत जाणीवजागृती कमी आहे. परिणामी अनेकांना आरोग्याबाबत माहिती व्हावी, म्हणून मकरसंक्रांतीच्या दिवसात महिला मेळाव्यांचे आयोजन करून माहिती देण्यात आली. सोबतच धार्मिक महोत्सव, कौटुबिक कार्यक्रमातून शौचालयाचे महत्व पटवून देण्यात आले होते. त्याला महिलांचा सहभाग लाभला.
स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या माध्यमातून जाणिवजागृती करण्यात आली. यात ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यामुळेच शौचालय बांधण्याच्या उद्दिष्टपूर्ती करण्यात मोठे यश मिळाले.
- एस. एच. आडे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद भंडारा.