६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:21 PM2019-07-30T22:21:35+5:302019-07-30T22:21:52+5:30
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या ई-कार्डचे उद्दिष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्याला ६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या ई-कार्डचे उद्दिष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्याला ६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्यांचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही त्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत ई-कार्ड वाटप संबंधाने गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हाण उपस्थित होते. आयुष्मान भारत योजनेत भंडारा यंत्रणांमार्फत १ लाख ७ हजार लाभार्थ्यांचे कार्ड बनविण्यात आले आहेत. ही प्रगती अत्यल्प असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. कार्ड बनविण्यासाठी लागणाºया थम मशिन गट विकास अधिकाºयांनी दोन दिवसात उपलब्ध करुन घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
हेल्थ कार्ड देण्यासाठी आर्थिक व सामाजिक जनगणनेच्या यादीमधील पात्र लाभार्थ्यांची निवड करुन नोंदणी करायची आहे.
यासाठी जिल्हयातील ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत, ठराविक रुग्णालय याठिकाणी आधार कार्ड व थम मशिनद्वारे नोंदणी करावयाची आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी समन्वय ठेवून उद्दिष्ट पूर्ण करावे. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी आयुष्मान भारत योजनेचा गावनिहाय आढावा घेतला. ई-कार्डसाठी लागणारे यंत्र तात्काळ खरेदी करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखापर्यंत आरोग्याचा विमा मिळणार आहे. सामान्य माणसासाठी ही आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची योजना असून या योजनेत अनेक आजारावर ईलाज करण्यासाठी हा विमा मदतगार साबीत होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपले ई-कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुपोषणाचे पुनर्सर्वेक्षण करा
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाचे पुनर्सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाला दिल्या. मॅम व सॅम दोन्ही कॅटेगिरीमधील सर्वेक्षणाचा यात समावेश असावा. या विषयावर आपण स्वत: डॉ.गीते लक्ष ठेवून आहेत. बालकाच्या आरोग्य विषयीच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी हा सर्वे आवश्यक आहे.