‘देवा, यंदा तरी पावशील का!’
By Admin | Published: June 25, 2016 12:32 AM2016-06-25T00:32:09+5:302016-06-25T00:32:09+5:30
जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांचे अवलोकन केले असता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
वखरणी, नांगरणीची कामे पूर्ण : बळीराजाच्या मनात धास्ती कायमच
विशाल रणदिवे अड्याळ
जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांचे अवलोकन केले असता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात शासकीय जाचात फसलेल्या शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट बळावले आहे. दरवर्षी येथील शेतकरी मोठ्या आशेने बियाणे पेरतो मात्र निसर्गचक्रासमोर तो हतबल ठरत आहे. देवा, यंदा तरी पावशील का? असा सवाल बळीराजा विचारीत आहे.
ज्याअर्थी हवामान खात्याचा अंदाज चुकू शकतो तर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, यंदा शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज पाहुन मोठ्या आनंदात शेतीची मशागत करायला सुरूवात केली. परंतु सद्यसिथतीची पाहणी केल्यावर बळीराजाच्या मनात धास्ती कायम आहे. निसर्गाचा लहरीपणा, हवामान खात्याचा चुकलेला अंदाज पाहुन यंदा शेती करावी की नाही हा गहन प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हे सर्व चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे असतानाही मात्र यावर्षी जमीन कसल्यावर कर्जाचा भार कमी होईल, मुलामुलींच्या लग्नासाठी मदत होईल आदी हेतुनेच येथील शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. आधी नक्षत्राच्या जोरावर शेतकरी शेतीची कामे पुर्ण करण्यावर भर असायचा . आता हवामान खात्याच्या माहितीवर शेतीची कामे अवलंबून आहेत.
आधी बि-बियानांचा पाहिजे तेवढा बाजार नव्हता आताच्या घडीला पेरेल ते उगवेलच याची शास्वती नाही. दरवर्षी कुठे ना कुठे पेरले पण उगवले नसल्याची चर्चा रंगते पण त्या शेतकऱ्यांचे आर्थिक स्थितीत कंबरडे मोडते.
आधीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत शेतकरी कसाबसा जीवन जगत आहे. त्यात दरवर्षी नवनवीन बियानांच्या नावावर कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणूक करून पैसे कमवित आहेत. याला कृषी विभागही जबाबदार असणार की नाही हाही एक प्रश्नच आहे.
अड्याळमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडणारे असले तरी १२ वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जे बंद झाली तरी अद्याप सुरू झालेली नाही. ही सत्यपरिस्थिती आहे. अड्याळमध्ये नेत्यांची कमी नाही असेही बाहेरचे म्हणतात. यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे पूर्ण करून ठेवली आहेत.
ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी आधीच पण ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था नाही ते मात्र आजही एका पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळेच तर यंदा तरी निसर्गराजा बळीराजाला तारणार की मारणार, असा सवाल सर्वांनाच भेडसावत आहे.