सनई चौघड्यांच्या गजरात भंडारेकरांनी बांधली चक्क देवाचीच लगीन गाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:47+5:30
भंडारा येथील खात रोडवर श्री सिध्दचिंतामणी गणपती मंदिर आहे. या मंदिराच्यावतीने ब्रम्हत्सोव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या टप्यात गतवर्षी राजोपचार पूजा थाटात करण्यात आली होती. त्यानंतर यंदा दुसऱ्या वर्षी ब्रम्होत्सवाची संकल्पपूर्ती करीत गणपती बाप्पांचा विवाह सोहळा पार पडला. विदर्भात पहिल्यांदाच असा आगळावेगळा विवाह सोहळा गुरुवारी भंडारेकरांनी अनुभवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लग्न गाठी देव स्वर्गात बांधतो असे म्हटले जाते. मात्र भंडारेकरांनी चक्क देवाचीच लग्नीन गाठ बांधली आणि सनई चौघड्याच्या गजरात गणपती बाप्पा आणि सिध्दीबुध्दीला विवाह बंधनात बांधले. येथील श्री सिध्दीचिंतामणी गणपती मंदिरात चार दिवसांपासून सुरु असलेल्या या विवाह सोहळ्याची सांगता गुरुवारी शुभमंगल सोहळ्याने झाली. या सोहळ्यात हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते.
भंडारा येथील खात रोडवर श्री सिध्दचिंतामणी गणपती मंदिर आहे. या मंदिराच्यावतीने ब्रम्हत्सोव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या टप्यात गतवर्षी राजोपचार पूजा थाटात करण्यात आली होती. त्यानंतर यंदा दुसऱ्या वर्षी ब्रम्होत्सवाची संकल्पपूर्ती करीत गणपती बाप्पांचा विवाह सोहळा पार पडला. विदर्भात पहिल्यांदाच असा आगळावेगळा विवाह सोहळा गुरुवारी भंडारेकरांनी अनुभवला.
या लग्नाच्या निमित्ताने दोनही घरी मांडव घालण्यात आला. नवऱ्या मुलीला मेहंदी लावण्यात आली. सीमांत पूजनही झाले. गुरुवार ३० जानेवारी हा ब्रम्होत्सवाचा दिवस उजाळला. सकाळी १०.३० वाजता गणपती बाप्पा आणि सिध्दीबुध्दी यांचा सांग्रसंगीत विवाह सोहळा पार पडला. वाजत गाजत भंडारा नगरीतून मिरवणूक काढण्यात आली. खरे तर हा विवाह सोहळा अगदी चार दिवस चालला. २६ जानेवारीच्या दिवशी सवाष्ण पूजन झाले. काकडे व निखाडे दाम्पत्याने सिध्दीबुध्दीचे तर रामेकर दाम्पत्याने गणपती बाप्पाचे कंकन बांधले. दोन्ही घरी मांडव घालण्यात आला. बुधवारी वधुवरांच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला. संध्याकाळी सीमांत पूजन झाले. साक्षात परमेश्वराचा हा सोहळा अगदी वेगळाच आणि तो पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली.
विवाह मुहूर्ताचा गुरुवार दिवस उजाळला. सकाळी ९ वाजता बहिरंगेश्वर मंदिर परिसरातून वरात चिंतामणी मंदिराच्या दिशेने निघाली. बग्गीत विराजमान सिध्दीबुध्दी आणि पालखीत गणपतीबाप्पा. अश्व, मंगलवाद्य आणि बॅण्डच्या गजरात खºयाखुºया लग्नवरातीलाही लाजवेल अशी वरात मंडपात पोहोचली. मंगलाष्टके झाली. बाप्पा लग्नीन गाठीत बांधले गेले. शेकडो वºहाड्यांनी अक्षतरुपी पुष्पांची वधुवरांवर वृष्टी केली. तब्बल दोन तास सुलग्न सुरु होते. गणपतीच्या लग्नाला ३३ कोटी देवतांची उपस्थिती लाभली म्हणून ३३ जोडप्यांचे ब्रम्हभोजन झाले. सप्तपदी, ओमहवन आणि एवढेच नाही तर विहिणीची पंगतही आटोपली.
दिवसभराचे सोपस्कार पार पडल्यानंतर वरात परतीच्या प्रवासाला निघाली. सजविलेल्या बग्गीत गणपतीबाप्पा रिध्दीबुध्दीला सोबत घेवून नगरभ्रमणासाठी निघाले. दीड तास नगरभ्रमणानंतर वरात वरपिता रामेकरांच्या घरी पोहोचली. भंडारा शहरातच नव्हे तर विदर्भात पहिल्यांच झालेला हा आगळावेगळा सोहळा अनेकांनी अनुभवला. गणपतीची उपासना घराघरात पोहोचावी या हेतूने मंदिर व्यवस्थापनाने हा विवाह सोहळा आयोजित केला होता.