सोन्याचा दर ३३ हजार; विक्री बेभाव
By admin | Published: November 11, 2016 12:42 AM2016-11-11T00:42:42+5:302016-11-11T00:42:42+5:30
मंगळवारी रात्री ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्दची घोषणा होताच भंडारा व तुमसर शहरात बुधवार व
पैसा निघाला बाहेर : भंडारा, तुमसरसह जिल्ह्यात विक्रमी सोने खरेदी ?
तुमसर/भंडारा : मंगळवारी रात्री ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्दची घोषणा होताच भंडारा व तुमसर शहरात बुधवार व गुरूवारला सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. रात्री १२ वाजतापर्यंत या नोटा वैध असल्यामुळे सोन्याचा दर ३० हजारावरून सरळ ३५ हजारावर पोहोचला. गुरूवारला रात्री सराफा व्यापाऱ्यांना सोन्याचा दर ३३ हजार रूपये असल्याचा संदेश आला आहे. असे असतानाही व्यापारी ग्राहकांकडून अधिकचा दर वसूल करीत आहेत.
गुरूवारला हा दर ३८ ते ४० हजाराच्यावर पोहोचला होता. परंतु पाचशे रूपयांच्या नोटा घेण्यासाठी दुकानदारांनी नकार दिल्यामुळे अनेकांना परतावे लागले. जिल्ह्यात सर्वाधिक सराफा दुकाने तुमसर शहरात आहेत. त्यामुळे या शहरात अतिरिक्त पैसा होता का? या चर्चांना पेव फुटले आहे.
तुमसर शहराला कुबेरनगरी असे संबोधले जाते. मंगळवारी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा रात्री १२ नंतर चलनातून बंद होण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांकरिता माहिती देणे सुरू होते तर दुसरीकडे एका वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली होती. यातून मार्ग काढण्याकरिता काहींनी सराफा दुकानदारांशी संपर्क साधून सोने खरेदी केले. सोने कमी व रक्कम जास्त अशी स्थिती निर्माण झाली होती. हिशोबाचे सोने विक्री करताना सराफा दुकानदारांची तारांबळ उडाली. त्यामुळे सोन्याचा दर एका तासात येथे ३५ ते ४० हजाराच्यावर पोहोचला.
सोने खरेदी करताना काही सराफा दुकानदार वगळता पक्के बिल येथे कुणी देत नाही. त्यामुळे अतिरिक्त पैसा सोन्यात गुंतविला आहे. मध्यरात्रीपर्यंत हा व्यवहार सुरू होता. येथून दोन ते अडीच तासात मध्यप्रदेश तथा छत्तीसगड येथे जाता येते. त्यामुळे सोने विक्रेते येथे सक्रीय झाले होते. बिल न दिलेल्या सोन्याचे दर चांगलेच वधारले होते. सोने विक्रीसाठी कठोर नियम असतानाही सोने खरेदी कशी केली? हे अनुत्तरीत आहे. (तालुका प्रतिनिधी)