वनीकरणाच्या साहित्य खरेदीचे गौडबंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:52 PM2017-10-24T23:52:13+5:302017-10-24T23:52:35+5:30
सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वृक्ष लागवड, रोप वाटीका, उद्यान तयार करणे मोकळया जागेवर वृक्षारोपन करण्याची कामे तुमसर तालुक्यात मोठा गाजावाजा करुन करण्यात आली.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वृक्ष लागवड, रोप वाटीका, उद्यान तयार करणे मोकळया जागेवर वृक्षारोपन करण्याची कामे तुमसर तालुक्यात मोठा गाजावाजा करुन करण्यात आली. वृक्षलागवड व वृक्ष वाढीकरिता औषध व इतर साहित्य खरेदी करताना त्यांची निविदा न काढताच खरेदी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून तीन दुकानदारांकडून बीले घेण्यात आली. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून खरेदी स्वखर्चाने केल्याची सारवासारव करणे सुरु आहे. शासनाने निधी उपलब्ध करुन दिला नाही अशी पुष्टीही अधिकाºयांने जोडली.
तुमसर तालुक्यात वेगवेगळया वनपरिक्षेत्रात वृक्षलावगड करण्यात आली. शासनाकडून मंजूर ठराविक निधीचा उपयोग करुन वृक्षलागवड करण्यात आली. राज्य मार्गाच्या दुतर्फा विनासरंक्षणाने वृक्षलागवड करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीत रोपवाटीला तयार करण्याची कामे करण्यात आली. यात वृक्षलागवड करणे, रोपवाटीका तयार करणे, तयार रोपवाटीकेचे संगोपन करणे, संरक्षण करणे, लागवड झालेल्या वृक्षांचे सलग पाच वर्षे पर्यंत निधी राखून त्यांना वेळोवेळी मुबलक पाणीपुरवठा करण्याचा समावेध आहे.
या कामांकरिता स्थानिक बेरोजगारांना मजूर म्हणून नेमण्यात आले. त्या मजूरांचे मानधन तथा विभागाच्या कर्मचाºयांचे वेतन मागील सहा महिन्यापासून झालेले नाही अशी माहिती आहे. वृक्ष लागवड झाली, रोपवाटीकेची कामे झाली, त्यांच्या संगोपनाकरिता किटकनाशक औषधी, फवारणीचे साहित्य, आवश्यक खतांची खरेदी मागील दोन महिन्यापासून झाली नाही. निधी शासनाने दिला नाही अशी माहिती संबंधित विभागाचे लागवड अधिकाºयानी दिली.
तत्पूर्वी तुमसर शहर, खापा (तु) व पचारा येथून औषधे व साहित्य दुकानातून करण्यात आले तशी बीले घेण्यात आली. परंतु ती बीले नसून इस्टीमेट बोलविण्याची माहिती लागवड अधिकारी देत आहेत. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करुन औषधे व साहित्य खरेदी केल्याची माहिती लागवड अधिकारी एफ.एम. राठोड यांनी दिली. वृक्ष संगोपन तथा संरक्षणाकरीता शासनातर्फे निधी मंजूर झाला नाही असे सांगितले.
आवश्यक किटकनाशक औषधे, खते, साहित्य स्वखर्चावर तथा उधारी ठेवून खरेदी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती लागवड अधिकारी राठोड यांनी दिली. नोव्हेंबर महिन्यात १ कोटी ५० लक्ष वृक्ष लागवडीचे उदिष्ट शासनातर्फे राबविण्यात येणार आहे.
तुमसर तालुक्यात पुढील वर्षी एक लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. वृक्ष लागवडीकरीता जमीन संबंधीत विभागाला मिळत नाही. हे वास्तव आहे. ग्रामपंचायती सहकार्य करीत नाही. हे विशेष. लाखोंचा निधी खर्च करुन वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली. त्यांचे नियोजन न करता पुन्हा वृक्ष लागवड कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. साहित्यांची खरेदी, निविदेविना करणे, उधारी ठेवून शासनाच्या निधी येईपर्यंत वाट पाहणे ही शोकांतीकाच म्हणावी लागेल.
सामाजिक वनीकरणात काम करणारे मजूरांची माहिती दरदिवशी भ्रमणध्वनीवर तहसील कार्यालयाला कळविण्यात येते. प्रत्यक्ष कामावर किती मजूर आहेत ते पाहण्याकरीता सबंधित विभागाचे कुणी जात नाही. कागदोपत्री तहसील कार्यालयाला माहिती का दिली जात नाही हा संशोधनाचा विषय आहे. रनेरा, मोहगाव ख, हरदोली, डोंगरला, तुमसर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवडीच्या नावावर मोठा घोळ दिसत आहे. चौकशी अंती येथे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वृक्ष लागवड तथा रोपवाटीकेकरिता उधारीवर दुकानातून साहित्य, औषधे घेण्यात आली. शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने खरेदी उधारीवर केली. दुकानदारांचे बील घेतले नसून ते इस्टीमेट सारखे आहे. काही खरेदी स्वखर्चाने केली.
-एफ.एम.राठोड, लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण तुमसर.