गुडमॉर्निंग पथक झाले बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:44 PM2019-01-28T21:44:05+5:302019-01-28T21:44:31+5:30
स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले. या प्रयोगाने नागरिकांच्या मानसिकतेत बदल होऊन शौचालयाचा वापर वाढू लागला होता. मात्र आता अलीकडे या उपक्रमाकडे प्रशासनाने पाठ फिरविली आणि स्वच्छता अभियान केवळ कागदावर राबविले जात आहे. त्यामुळे साकोली तालुक्यात गुडमॉर्निंग पथक आता बेपत्ता झाले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत साकोली तालुक्यातील गावे ३१ मार्च पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचनाही दिल्या होत्या. घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. त्यातीलच महत्वाचा घटक म्हणजे गुडमॉर्निंग पथक होय. या पथकात सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक अशा व्यक्तींचा समावेश होता. हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळात उघड्यावर शौचास जाणाºयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत होते. या प्रयोगामुळे काहींची गैरसोय झाली होती. मात्र हा प्रयोग काही दिवसाचाच ठरला. त्यानंतर पथकाने पाठ फिरविली आणि नागरिक पुन्हा उघड्यावर जाऊ लागले. नागरिकांच्या मानसिकतेत कोणताही बदल झाला नाही. काही गावात तर शौचालय केवळ कागदोपत्री असून काहींच्या बांधकामाचा दर्जाही निकृष्ट आहे. त्यामुळे गुडमॉर्निंग पथक आता लुप्त झाल्याचे दिसत आहे.
प्रशासनाचे तोकडे प्रयत्न
नागरिकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रशासनाने जोरकस प्रयत्न करणे गरजेचे होते. वैयक्तिक लाभाच्या शौचालयाचे बांधकाम दर्जेदार करून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे गरजेचे होते. परंतु प्रत्येक योजना राबविताना संबंधित मंडळी अर्थकारण विचारात घेत असल्याचे दिसून आले. शासकीय योजनेचे कुणालाही काही देणे घेणे दिसत नाही. त्यामुळे ही कल्याणकारी योजना फसली असून गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सार्वजनिक शौचालयाचा अभाव
साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायतीच्या काळातील सार्वजनिक शौचालय आहे. तीन वर्षात नगरपरिषदेने एकही नवीन सार्वजनिक शौचालय बांधले नाही. परिणामी नागरिक उघड्यावर जात आहे.