भल्या पहाटे ब्रेड-पाव, ताेसची कोवळ्या आवाजात आरोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:42+5:302021-07-27T04:36:42+5:30
करडी (पालोरा) : कोरोना विषाणूने दूरगामी प्रभाव पाडला असून, शिक्षण क्षेत्र पार झपाटून गेले आहे. त्यामुळे कोरोना आला ...
करडी (पालोरा) : कोरोना विषाणूने दूरगामी प्रभाव पाडला असून, शिक्षण क्षेत्र पार झपाटून गेले आहे. त्यामुळे कोरोना आला रे आला, की शाळा बंद, अशी अवस्था झाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी शैक्षणिक सत्र सुरू झाले होते; परंतु पुनःश्च कोरोना आगमनाने विद्यार्थ्यांच्या शाळा बंद झाल्या आहेत. शाळेतच जायचे नाही म्हटल्यावर खेड्यातील विद्यार्थी पूर्णतः बिनधास्त झाले आहेत. मग रिकाम्या वेळेत खेळून-खेळून खेळणार किती? अशा प्रतिकूल परिस्थितीत काही शाळकरी मुलांनी ब्रेड विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आता भल्या पहाटे गावखेड्यात ब्रेड-पाव, ताेस अशी कोवळ्या आवाजात आरोळी ऐकायला येते.
सध्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे विदारक शैक्षणिक चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. विद्यार्थी घरीच आहेत. अभ्यास करायला, खेळायला, टीव्ही, मोबाइल पाहायला, छंद जोपासायला भरपूर वेळ मिळूनही आता विद्यार्थी कंटाळून गेले आहेत. या अशा परिस्थितीत परिसरातील काही मुलांनी नवा रोजगार शोधला आहे. घरी असलेल्या सायकलचा वापर करून हा धंदा सुरू झाला आहे. ब्रेड-पाव विक्रीचा हा व्यवसाय असून, भल्या पहाटे सायकलवर स्वार होऊन गावागावात, गल्लोगल्ली डबलरोटी असा आवाज देत विकताना नजरेस पडतात. करडी व परिसरातील २० ते २५ शाळकरी मुले करडी बेकरीमधून डबलरोटी विकत घेतात. निलज बु., देव्हाडा बु., मोहगाव, नवेगाव बु., निलज खुर्द, पांजरा, बोरी, पालोरा, मुंढरी ही गावे गाठतात. करडी येथील ५-१० मुले मागील कित्येक दिवसांपासून पावसाळ्यात सकाळ डबलरोटी विक्री करीत आहेत. या उद्योगातून मुलांना मिळकतही प्राप्त होते.
विद्यार्थ्यांचा स्वमर्जीचा व्यवसाय
ब्रेड विक्रीबाबत करडी येथील डबलरोटी विकणाऱ्या शाळकरी मुलांशी गप्पा केल्यावर मुले बोलती झाली. स्वखुशीने गावातच मोहल्ल्यामध्ये डबलरोटी तोस विकत असल्याचे सांगितले. चार महिने ब्रेड विकून कमावलेल्या पैशाने कुणी नोटबुक, तर कुणी नवीन कपडे घेत असल्याचे सांगितले. मुलांच्या दिलखुलास बोलण्यावरून मुले स्वतःच स्वमर्जीने ब्रेड विकत असल्याचे लक्षात आले.
मिळकतीचा उपयोग वह्या-नोटबुक व कपडे खरेदीसाठी
मुले कमावत असलेल्या पैशाने घरीसुद्धा मदत होत असल्याचे समजते. त्यामुळे पालकही त्यांना ब्रेड विकण्यास आडकाठी आणत नसावेत. दररोज सकाळी साडेपाच वाजेपासून आठ वाजेपर्यंत ब्रेड विक्रीतून ९०-१०० रुपयांचा गल्ला जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या आगमनापूर्वीपासून ब्रेड विक्री सुरू असल्याची माहिती मुलांनी यावेळी दिली.
260721\img-20210726-wa0035.jpg~260721\img-20210726-wa0034.jpg
*हॅलो डबल रोटी तोस" म्हणणारे चिमुकले व्यावसायिक*~*हॅलो डबल रोटी तोस" म्हणणारे चिमुकले व्यावसायिक*