होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:39+5:302021-07-07T04:43:39+5:30
भंडारा : गत दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे अनेकांचे लग्नसोहळे लांबले होते. अद्यापही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असला तरी अनेकांनी होऊन ...
भंडारा : गत दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे अनेकांचे लग्नसोहळे लांबले होते. अद्यापही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असला तरी अनेकांनी होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधानची भूमिका आरंभली आहे. विवाह मुहूर्त आगामी तीन महिन्यांत कमी असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे अनेक जण आधीच लग्नसोहळे उरकण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे नोव्हेंबर ते मार्चपर्यंत विवाहासाठी शुभमुहूर्त असतानाही तालुका प्रशासनाकडे लग्नसमारंभासाठी परवानगी घेण्यासाठी अर्ज येत आहेत.
शुभमुहूर्त
यावर्षी विवाह समारंभासाठी एकूण ६१ मुहूर्त होते. आता अर्धवर्ष लोटले असून एप्रिल ७ ते १५ जूनपर्यंत व जुलै महिन्यात फक्त बोटांवर मोजण्याइतकेच शुभमुहूर्त होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत लग्नाचे तब्बल २९ मुहूर्त आहेत. त्यामुळे सध्या लग्न होत असले तरी नोव्हेंबरनंतरच लग्नाचा बार उडतो की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्याही भीतीमुळे लग्नसमारंभ होतील.
या असतील अटी
कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने विवाह सोहळ्यांवरही निर्बंध आणले होते. आताही ते निर्बंध कायम असून विवाह सोहळ्यात फक्त ५० लोकांच्या कमाल मर्यादेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही दिसून येते.
परवानगीसाठी अग्निदिव्य
लग्न सोहळ्याच्या परवानगीसाठी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावे लागते. यात राज्यशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे लग्नसमारंभ होतील, याची हमीही अर्जातून द्यावी लागते. शिवाय नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईला आयोजक जबाबदार राहतील, याचीही सूचना दिली जाते.
वधू-वर पित्याची कसरत
लग्न समारंभ म्हटले की, नातलगांची रेलचेल राहणार. त्यातही नेमके २५ वऱ्हाडींना आमंत्रित करणे म्हणजे स्वत:ला धर्मसंकटात पकडण्यासारखे आहे. कोरोनामुळे निर्णय घ्यावा लागेल.
-महेश लाडे, वरपिता
५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न पार पाडायचे आहेत. लिस्ट तयार केली; मात्र अजूनही बऱ्याच नातेवाइकांची येण्याची तयारी आहे. मात्र, त्यांना आम्ही आमंत्रित केलेले नाही.
-गुणीराम पंधरे, वधूपिता