हसारा येथे गुडमॉर्निंग पथकाने ठेवली तलावाभोवती पाळत

By admin | Published: February 18, 2017 12:25 AM2017-02-18T00:25:44+5:302017-02-18T00:29:43+5:30

तुमसरला लागून असलेल्या ग्रामपंचायत हसारा येथे शुक्रवारला गट संसाधन केंद्र, पाणी व स्वच्छता, पंचायत समिती तुमसर यांचे गुड मॉर्निंग पथकाने पहाटेला धडक दिली.

Gooding at Hussara keeps the team around the pond kept | हसारा येथे गुडमॉर्निंग पथकाने ठेवली तलावाभोवती पाळत

हसारा येथे गुडमॉर्निंग पथकाने ठेवली तलावाभोवती पाळत

Next

उघड्यावर जाणाऱ्यांना शौचालयात बसविले : हागणदारीच्या विळख्यातील तलाव वाचविण्यासाठी पुढाकार
भंडारा : तुमसरला लागून असलेल्या ग्रामपंचायत हसारा येथे शुक्रवारला गट संसाधन केंद्र, पाणी व स्वच्छता, पंचायत समिती तुमसर यांचे गुड मॉर्निंग पथकाने पहाटेला धडक दिली. दरम्यान साखर झोपेत असतांना शौचास उघडयावर जाणाऱ्या काही महिला पुरूषांना गुलाबाचे फुले देवून स्वागत करण्यात आले. व शौचालयाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.
दरम्यान गावाला लागून असलेल्या तलावाचा शौचाकरिता वापर करण्यात येत असल्याने तलाव उघड्या हागणदारीच्या विळख्यात सापडलेला आहे. तलावाला सुशोभित करून वाचविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तर पथकात असलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट यांनी महिलांचे रक्षण करण्याची जबाबदारी कुटुंबातील प्रमुखाने घेवून शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन केले. अगोदरच गुड मॉर्निंग पथकाची धास्ती पसरली असताना हसारा येथे गुडमॉर्निंग पथकाच्या कारवाईने शौचालयाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
तुमसर तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांचे मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून गट विकास अधिकारी विजय झिंगरे यांचे नेतृत्वात पहाटेच्या सुमारास ग्राम पंचायत हसारा येथे गुड मॉर्निंग पथकाने आपला उपक्रम राबवून उघड्यावर बसणाऱ्यांना गुलाबाचे फुले देवून उघडयावर शौचास जाण्यास मनाई केली.
यावेळी पथकात स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी विजय वानखेडे, उपसरपंच धनराज आगाशे, विस्तार अधिकारी युवराज कुथे, ग्रामविकास अधिकारी हरीदास पडोळे, सचिव प्रदीप चामाटे, जिल्हयाचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, तुमसरचे पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास, गट समन्वयक पल्लवी तिडके, समुह समन्वयक शशिकांत घोडीचोर, हर्षाली ढोके, पाणी गुणवत्ता सल्लागार पौर्णिमा डूंभरे, ग्राम लेखा समन्वयक वर्षा दहीकर, ग्रामसेवक नितीन राठोड, खोबरखेडे, अक्षय नापते, राकेश डोंगरे, ढेंगरे, ग्रामपंचायत सदस्य दूर्गा आगासे, देवचंद भगत, उषा शरणागत, अंगणवाडी सेविका वंदना कटरे, इंदू डहारे, माजी तंमुस अध्यक्ष मोरेश्वर कटरे, सुनील पटले, छोटेलाल पटले वाहनचालक महेश शेंडे, टिंकू क्षिरसागर यांची उपस्थिती होती.
पहाटेच्या सुमारास गुड मॉर्निंग पथकाची चमू गावात पोहचल्यानंतर गावातील उघडयावरील हागणदारीची स्थिती जाणून घेतली. व त्यानुसार दोन गटात पथक तयार करून तुमसरकडे जाणारा मार्ग, हिंगणाकडे जाणारा मार्ग, रेल्वेपटरीकडे जाणारा मार्ग, शेताकडे जाणारा मागार्ने गस्त टाकली. अंधारात शौच उरकून जाणाऱ्या काही जणांना रस्त्यातच गाठून गुलाबाचे फुलांनी स्वागत करण्यात आले व शौचालयाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच गावालगतच तलावा असून त्या तलावाचे निरीक्षण केले असता संपूर्ण तलाव उघड्या हागणदारीमध्ये अडकला असल्याचे लक्षात आले तर काही प्रत्यक्षदर्शनी सांगितले. दरम्यान काही जण तलावात शौच करताना आढळले.
पथकाने आपली गस्त तलावाच्या दिशेने वळवून उघडयावर शौच करणाऱ्यांना गाठले व त्यांनाही शौचालयाचे महत्व व कुटूंबांसाठी शौचालयाची महती पटवून देण्यात आली व गुलाबाच्या फुलांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान तलावाच्या पाळीवर उघड्या हागणदारीचे दर्शन झाल्याने पाळीवरच नागरिकांमध्ये उघडयावर शौचास जाण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून आले. गावांतील विविध रस्ते, शेतातील भाग पिंजून काढल्यानंतर तलावाभोवती पाळत ठेवण्यात आली. दरम्यान पथकाची माहिती नागरिकांना लागल्याने बहुतांश जणांनी आपला मार्ग बदलला तर काहींनी शौचालय बरा समजून शौचालयाचा वापर केला. तसेच दोन व्यक्तींना उघड्यावर जातांना गाठण्यात आले व त्यांना शौचालयाचे महत्व सांगून ग्राम पंचायतीच्या शौचालयात जाण्यास बाध्य करण्यात आले. त्यांनी ग्राम पंचायतीच्या शौचालयाचा वापर करून आपले सोपस्कार पार पाडले.
त्यानंतर गावालगतच्या तलावाभोवती संपूर्ण पथकाच्या चमूने पाळत ठेवली व उघडयावर शौचास जाणाऱ्यांना रोखले. बराच वेळ तलावाच्या पाळीवर पाळत ठेवल्याने उघडयावर जाणारे पुरूष इकडे शौचास आले नाहीत. त्यानंतर तलावालगत संपूर्ण पथक व नागरिक, महिला मुले यांची बैठक घेवून गाव स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
उघड्या हागणदारीच्या विळख्यात अडकलेल्या तलावाला वाचविण्याचे गावकऱ्यांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य मार्गाने पथकाने मार्गक्रमण करून ग्रामस्थांना शौचालय बांधा व त्याचा वापर करा. असे मार्गदर्शन करून त्याबाबत नारे देत हागणदारीमुक्त गावासाठी वातावरण निर्मिती केली. (प्रतिनिधी)

अपंग सुनील झाला पथकात सहभागी
हसारा येथे गुड मॉर्निंग पथकाने पहाटेपासून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबाच्या फुलांनी स्वागत करून शौचालयाचा वापर करण्याचा सल्ला दिल्यानंतर येथील दोन्ही पायांनी अपंग असलेला सुनील पटले हा तरूण मागे राहिला नाही. हागणदारीमुक्तीच्या पथकात सहभागी झाला. पथकाने ज्या ज्या ठिकाणी पाळत ठेवली त्या ठिकाणी त्यांने येवून स्वच्छता गावासाठी , घरासाठी, कुटूंबासाठी महत्वाची असल्याचे मान्य केले. यापूढे गावातील व्यक्तींना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. त्याची जिदद व चिकाटी पाहून इतरांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
महिलांच्या रक्षणाची जबाबदारी ही कुटुंबप्रमुखाची
कुटुंबातील महिलांचा मान सन्मान राखणे ही घरातील कुटूंंब प्रमुखाची जबाबदारी आहे. महिलांच्या मान सन्मानासाठी कुटूंब प्रमुखांनी पुढाकार घेवून शौचालयाचे बांधकाम करावे व त्याचा वापर करावा असे आवाहन महिला परिषदेच्या विदर्भ अध्यक्षा मिरा भट यांनी केले. बहुतांश महिला उघड्यावर शौचास जातात. त्यातूनच अनेक प्रसंग घडतात. हा प्रकार रोखता येतो व यासाठी घरातील कर्त्या पुरूषांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शौचालयाचा वापर केल्यानेच महिला व कुटूंबांचा मान सन्मान प्रतिष्ठा ठेवता येते, यासाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

Web Title: Gooding at Hussara keeps the team around the pond kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.