गोसावी स्मारक, मंदिरांचा जीर्णोद्धार
By Admin | Published: April 8, 2016 12:34 AM2016-04-08T00:34:01+5:302016-04-08T00:34:01+5:30
अत्यंत दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या मेंढा येथील प्राचीन गोसावी स्मारक व मंदिर समुहाचे पुरातत्व विभागातर्फे आवारभिंत व मंदिराच्या आवारातील फ्लोरिंगचे कामे पूर्ण करण्यात आले.
पुढाकार : तर मिळू शकते पर्यटनाला चालना
भंडारा : अत्यंत दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या मेंढा येथील प्राचीन गोसावी स्मारक व मंदिर समुहाचे पुरातत्व विभागातर्फे आवारभिंत व मंदिराच्या आवारातील फ्लोरिंगचे कामे पूर्ण करण्यात आले. आता या मंदिराला नवसंजीवन मिळणार आहे. १०-१२ वर्षापूर्वी हा मंदिर परिसर, झाडे, झुडपे, कचऱ्यात व अत्यंत घाणेरड्या परिस्थितीत अंतिम घटका मोजत होता. ग्रीन हेरिटेजचे संस्थापक अध्यक्ष मो. सईद शेख यांनी या परिसराचा कायापालट व्हावा याकरिता पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून प्रयत्न सुरु ठेवले. प्रभातकुमार गुप्ता यांनीही या कार्यात सहकार्य करून या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
१२ व्या शतकात रामचंद्र यादव नंतर गादीवर आलेल्या राजा महादेव यादव यांच्या कार्यकाळात मंत्रीपदावर असलेल्या हेमाद्री (हेमाडपंत) या विद्वाद वास्तू शिल्पकाराने दगडावर दगड रेचून चुनखडीच्या सहाय्याने मंदिर बांधण्याचे तंत्र विकसीत केले. १३ व्या शतकात भंडारा शहरात हेमाडपंथी मंदिरे भृशुंड गणेश मंदिराशेजारी (मेंढा येथे) लक्ष्मीनारायण मंदिर, महादेव मंदिर इ. हेमाडपंथी तंत्रानुसार चार मंदिराचा समूह तयार करण्यात आला. याच पद्धतीने अंबाई, निंबाई, पिंगलाई, कोरंबीदेवी हलधरपुरी येथील म ंदिरे तयार करण्यात आली. हेमाद्री पंथाच्या तंत्रानुसार तयार केलेल्या मंदिरांना हेमाडपंथी मंदिर म्हटले जाते.
कालांतराने या मंदिरात पुजारी किंवा मंदिराचे रक्षक म्हणून नाथ पंथातील (गिरी पंथ) गोसावी या मंदिराच्या शेजारी राहू लागले. यांनीच नंतर या ठिकाणी मठाची स्थापना केली.
मंदिरात अनेक ठिकाणी अतिप्राचीन गणेशाची दगडाची मूर्ती व अनेक देवी देवता, जनावरे, पशु पक्षी, राक्षसे, पुष्प ई. च्या कलात्मक मूर्ती सुंदर नक्षिकाम केलेले स्मारके पाहण्यासारखे आहेत. सुरुवातीला हा परिसर, झाडे, झुडपे, कचऱ्यात व अत्यंत घाणेरड्या स्थितीत होता. या मंदिर परिसराचे जतन सौंदर्यीकरण व्हावे याकरिता ग्रीन हेरिटेज पर्यटन व पर्यावरण संस्थेतर्फे प्रयत्न सुरु करण्यात आले. गिरी गोसावी समाजाचे मंदिराशेजारी राहणाऱ्या लोकांची एक समितीद्वारे नोंदणी करून ट्रस्ट बनविण्यात आले. ट्रस्टच्या वतीने याकरिता अनेक वर्षे प्रयत्न सुरु होते. अखेर आतापर्यंत उपेक्षित असलेल्या या मंदिर समूहाची शासनाच्या पुरातन खात्यातर्फे दखल घेण्यात आली आणि संरक्षित भिंत व साफसफाई इ. कामाकरिता ७३ लाख रुपये मंजूर करण्यात येऊन कामास सुरुवात झाली. खोदकाम सुरु असताना मोगलकालीन चांदीच्या नाणी मिळाल्या होत्या. संरक्षित भिंत व फ्लोरिंगचे कामे पूर्णत्वास आले आहेत. पुरातत्व विभागातर्फे लवकरच सौंदर्यीकरण, जिर्णोद्धार व जतन विषयक कामे केली जाणार असून भविष्यात हे स्थळ भंडारा व परिसरातील एक आकर्षण ठरून महाराष्ट्रात पर्यटन व तिर्थस्थळ म्हणून नावारुपास येईल यात शंका नाही.
(प्रतिनिधी)