पाच वर्षात गोसेखुर्दला दमडीही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:29 PM2018-11-25T21:29:23+5:302018-11-25T21:30:38+5:30
साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव चौ. : साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता. मात्र मागील पाच वर्षात केंद्र सरकारने गोसेखुर्द धरणासाठी एक दमडीही दिलेली नाही. परिणामी येथील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
आसगाव येथे मध्यवर्ती बँक शाखेच्या एटीएम केंद्राचे उद्घाटन व शेतकरी जनजागृती मेळाव्याप्रसंगी उद्घाटक म्हणून खा. पटेल बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार होते. विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुध्दे, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, पालक संचालक अशोक मोहरकर, बाजार समितीचे सभापती लोमेश वैद्य, जि.प. सदस्य चित्रा सावरबांधे, पं.स. सदस्य मंगेश पाटील ब्राम्हणकर, खरेदीविक्री संस्थेचे अध्यक्ष माणिक ब्राम्हणकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक हत्तीमारे, सरपंच विपीन बोरकर, जि.प चे माजी सदस्य विजय सावरबांधे, माजी संचालक किशोर पालांदूरकर, मोहन सुरकर, अर्चना वैद्य, पंढरीनाथ सावरबांधे, गोपाल सावरबांधे, मोहन पंचभाई, हिरालाल खोब्रागडे, यादव डोये, बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, सरव्यवस्थापक संजय बर्डे आदी उपस्थित होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, काँग्रेस सत्तेत असतांना आम्ही सरसकट कर्जमुक्ती केली. मात्र विद्यमान सरकारने जाचक अटी लावून शेतकऱ्यांना वेटीस धरले आहे. आजघडीला भेल कारखान्याची अवस्था सर्वांना माहित आहे. बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासनही हवेत विरले आहेत. विदर्भातील सर्वच जिल्हे विकास कामापासून मागे आहेत.
विदर्भाचे मुख्यमंत्री असतांनाही त्याच विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. भाजप सरकारने जनसामान्यांसाठी काय केले. असा प्रश्न उपस्थित करुन शेतकºयाना या सरकारने सर्वात मागे टाकले आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकार कमी केल्यामुळे यापुढे या संस्थांचा निवडणूकीत उभे राहावे की नाही असा प्रश्न उमेदवारांसमोर उभा राहणार आहे. धर्माचा नावावर मत मागणाऱ्यांना नागरिकांनी धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्य उपस्थितीत एटीएम चे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी तर आभार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी मानले.