‘गोसेखुर्द’ बळीराजांसाठी दिवास्वप्न
By admin | Published: September 19, 2015 12:37 AM2015-09-19T00:37:15+5:302015-09-19T00:37:15+5:30
महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे.
शेती सिंचनापासून वंचित : चंद्रपूरात जलपूजन तर भंडारात जलसंकट
खेमराज डोये आसगाव (चौ.)
महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे. शासनाने हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात. मात्र, त्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळाले नसल्याने हा प्रकल्प त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरला आहे.
या धरणाचे उजवा व डावा कालव्याच्या पाळीचे काम पूर्ण आहे. या धरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी शासनाने मागितलेल्या किंमतीत दिल्या. या प्रकल्पामुळे अनेक गावे व कुटुंब विस्तापित झालीत. याच उजव्या कालव्याच्या पाळीतून चंद्रपुर जिल्ह्यातील असोलामेंढा तलावाला मागील आठवड्यात गोसे धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदोत्सोव साजरा करण्यात येत आहे. परंतु, हा हरितक्रांतीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प ज्या पवनी तालुक्यात बांधण्यात आला, तेथील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा एक थेंबही मिळाला नसल्याने शेकडो हेक्टरमधील पिके नष्ट होण्याचा दुदैवी प्रसंग ओढवला आहे.
पवनी व लाखांदूर या तालुक्यातील डाव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा होवून हमखास धानाचे पीक वाचू शकते. परंतु डाव्या कालव्यांना कुठेही गेट लावले नसल्यामुळे व पागोला उपसा सिंचन योजना कार्यान्वित न केल्यामुळे या धरणाच्या पाण्याचा फायदा भंडारा, लाखनी, तालुक्याला होवू शकत नाही. पर्यायाने येथील शेतीतील उभे पीक सिंचनाअभावी हातून जाण्याच्या मार्गावर आहे.
डाव्या कालव्यात गोसे धरणाचे पाणी सोडले जात आहे. पंरतु, याचा २५ टक्केही लाभ पवनी, लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे ज्या तालुक्यात हे महाकाय धरण बांधले आहे. त्याच शेतकऱ्यांना फायदा मिळताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात पाणी पोहचले म्हणून तिकडे ‘जलपूजन’ तर प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवलेल्या तालुक्यातील शेतीवर ‘जलसंकट’ असा दुजाभाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांवर, ‘घरी अळ, अन् पाण्यासाठी लळ’ असा प्रसंग ओढवला आहे.