गोसेखुर्दचे कालवे अपूर्ण सिंचनाचा प्रश्न कायम

By admin | Published: December 3, 2015 01:04 AM2015-12-03T01:04:42+5:302015-12-03T01:04:42+5:30

भंडारा विधानसभा मतदारसंघात गोसेखुर्दचे अपूर्ण कालवे व प्रकल्पबाधीतांचे पुनर्वसन, उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी सुविधा, नाग नदीच्या पाण्यामुळे दूषित झालेले वैनगंगेचे पाणी,....

Gosekhurd's canal continues to be a question of incomplete irrigation | गोसेखुर्दचे कालवे अपूर्ण सिंचनाचा प्रश्न कायम

गोसेखुर्दचे कालवे अपूर्ण सिंचनाचा प्रश्न कायम

Next

गोसेखुर्दचे कालवे अपूर्ण सिंचनाचा प्रश्न कायम
दुर्लक्षित मतदारसंघ : भंडारा मतदारसंघाला विकासाची प्रतीक्षा
अशोक पारधी पवनी
भंडारा विधानसभा मतदारसंघात गोसेखुर्दचे अपूर्ण कालवे व प्रकल्पबाधीतांचे पुनर्वसन, उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी सुविधा, नाग नदीच्या पाण्यामुळे दूषित झालेले वैनगंगेचे पाणी, वन व कृषी पर्यटन, पर्यटकांसाठी सोयी सुविधा, निलज-कारधा एकेरी वाहतुकीचा राज्यमार्ग, प्राचीन ठेव्याची दुर्दशा, पवनीतील पर्यटन संकुलाचे भिजत घोंगडे, आरोग्य सेवेतील कमतरता, नेरला उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे, शेतकऱ्यांचा पांदण रस्त्याचा प्रश्न, कृषी उत्पादनासाठी साठवणूक केंद्र, स्पर्धा परीक्षांचे शासकीय मार्गदर्शन केंद्र व व्यवसायाला चालना देण्यासाठी उपयोगी पडेल असा नागपूर-पवनी-नागभिड रेल्वेचा ब्राडगेजचा प्रश्न असे कित्येक प्रश्न आवासून कायम आहेत.

गोसेखुर्दचे अपूर्ण कालवे
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २७ वर्षाचा कालावधी लोटला. उजवा व डावा मुख्य कालवा जवळपास पूर्ण झाला परंतू शेतात पाणी पोहोचविण्यासाठी लागणारे लघू कालवे अपूर्ण आहेत. ते पूर्ण झाल्याशिवाय हरितक्रांतीचे स्वप्न पाहता येत नाही. चौरस भाग पूर्वी समृद्ध होता परंतू अलिकडे तेथील पाण्याची पातळी खोल गेली. विहीरी कोरड्या पडल्या. पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे
राष्ट्रीय प्रकल्पाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे व लघू कालवे करण्यासाठी शासनाकडे आर्थिक तरतुदीची मागणी केली तरच शेतकरी शेती करू शकेल. धरणात पाणी साठवावयाचा असेल तर प्रकल्प बाधीतांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला गेला पाहिजे. अद्यापही खापरी (रेहपाडे) गावाला पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही.
नागपूर-पवनी रोड रेल्वे
इंग्रजांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून नागपूर-नागभिड-गोंदिया रेल्वे मार्ग निर्माण केलेला होता.
गरजेनुसार नागभिड-गोंदिया मार्ग ब्राडगेज करण्यात आला परंतू नागपूर-नागभिड रेल्वेमार्ग ब्राडगेज करण्यात आलेला नाही. त्यामुळे पवनी तालुक्यातील जनतेला व्यावसायीक दृष्ट्या त्याचा फायदा होवू शकला नाही. केंद्र शासनाने ब्राडगेज प्रस्ताव मंजूर केला परंतू रक्कमेची तरतूद केलेली नाही. त्यामुळे रेल्वे मार्गाचे काम रखडलेले आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून रेल्वे ब्राडगेजचा प्रस्ताव मार्गी लावावा, अशी अपेक्षा आहे.
धान्य साठवणूक केंद्र
शेतकऱ्यांना धान्य साठविण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेमधून साठवणूक केंद्र गोडावून उभे करण्याची योजना आहे परंतू तालुक्यात ते होवू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धान्य साठविण्यासाठी पुरेसे साठवणूक केंद्र नाहीत परिणामी विकायला नेलेले धान्य उघड्यावर ठेवले जाते. शेतकऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे साठवणूक केंद्राची गरज आहे.

भंडारा विधानसभा मतदार संघात हरितक्रांती करण्यासाठी सिंचन क्षमता वाढविण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पावर आधारित लिफ्ट इरिगेशन लवकरात लवकर कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गोसेखुर्दच्या जलसाठ्यात जलवाहतुकीद्वारे पर्यटन सुविधा उपलब्ध करून शासनाचा महसूल व तरूणांना काम देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आमदार, भंडारा.
शेतकऱ्यांचे धान्य साठविण्यासाठी गोडावून, धान्याचे आधारभूत किंमतीत वाढ व गोसेखुर्द धरणाचे कालव्याचे काम पूर्ण करून सिंचनाची सोय करावी. शेतीसाठी २४ तास विद्युत उपलब्ध करून द्यावी.
- लोमेश वैद्य, सभापती, कृउबा समिती, पवनी.
औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी सुरू व्हावी, तर युवकांना रोजगार उपलब्ध होऊन क्षेत्राचा विकास होईल तसेच कृषी व तंत्रशिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी.
- रजनी मोटघरे, अध्यक्ष, नगरपरिषद, पवनी.
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात शल्य चिकित्सक व महिला वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावे, तसेच रक्तपेढी असावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा परिपूर्ण भरून सामान्य लोकांना रुग्णसोयी पुरवाव्यात.
- डॉ.प्रकाश देशकर, माजी नगराध्यक्ष, पवनी.

वैनगंगा पवित्र नदी समजल्या जायची. शेकडो मैलावरून लोक पवित्र स्नानासाठी यायचे. तहान लागल्यास नदीचे पाणी ओंजळीने प्यायचे. परंतू गोसेखुर्द धरण झाले आणि पवनी तालुक्यातील जनतेला नागनदीचे साठवलेले दूषीत पाणी पिण्याची व शेताला वापरण्याची वेळ आलेली आहे. दूषित पाण्यामुळे कावीळसारखे आजार व पोटाचे आजार वाढत चालले आहेत. शेतात पिकाला दूषित पाणी दिल्या जात असल्याने शेतातील पिकसुद्धा किडीने नष्ट केल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे.
नेरला उपसा सिंचन योजना
गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. डाव्या कालव्याने जिथे सिंचन होवू शकत नाही त्या शेतीला या योजनेपासून पाणी मिळणार आहे परंतु विद्युत पुरवठा न झाल्यामुळे योजना बनून तयार असली तरी कार्यान्वित झालेली नाही. कालवेसुद्धा अपूर्ण आहेत. योजनेमुळे शेकडो हेक्टर शेतीला सिंचन उपलब्ध होणार आहे तरीही शासनाचे लक्ष नाही.
वन व कृषी पर्यटन
पवनी तालुक्यात उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा काही भाग आहे. मोठ्या प्रमाणात वनव्याप्त जमीन आहे. चौरास भागात प्रयोगशिल शेतकरी आहेत. त्यामुळे वन व कृषी पर्यटनासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ पवनी तालुक्याला मिळाल्यास विकास शक्य आहे. मात्र याठिकाणी विकासासाठी अद्याप पुढाकार घेतलेला नाही.
एमआयडीसीचे भिजतघोंगडे
अड्याळचे तत्कालीन आमदार विलासराव शृंगारपवार यांनी एमआयडीसी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर आमदार बंडूभाऊ सावरबांधे यांनी जागेचा प्रश्न मार्गी लावला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एमआयडीसीचे भूमिपूजन केले. आता विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे यांनी युती शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Web Title: Gosekhurd's canal continues to be a question of incomplete irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.