गोसेचे बॅकवॉटर शेतात, तीन वर्षांपासून मोबदला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2022 08:39 PM2022-11-06T20:39:22+5:302022-11-06T20:41:35+5:30
दवडीपार गाव गोसेच्या बुडीत क्षेत्रालगत आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पात गेली, तर अनेक शेतकऱ्यांची बुडीत क्षेत्रालगत शेती आहे. बॅकवॉटर कोठपर्यंत येणार याचे सीमांकन करण्यात आले होते. शेतापासून सीमांकनाचा दगड दूर असल्याने शेतकरी धानाची बिनधास्त रोवणी करतात. मात्र गत तीन वर्षांपासून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी वाढली की दवडीपार येथील शेतात पाणी शिरते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बुडीत क्षेत्राबाहेरील शेतात गोसेचे बॅकवॉटर शिरत असून, काढणीला आलेला धान शेतातच सडत आहे. तीन वर्षांपासून हा प्रकार भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे सुरू आहे. २० शेतकऱ्यांच्या सुमारे ६० एकरात पाणीच पाणी असते. मात्र, या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यात प्रत्येक शेतकऱ्याचे ४० ते ५० हजारांचे नुकसान होत आहे. पाणी पातळीच्या चुकीच्या सर्वेक्षणाचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे.
दवडीपार गाव गोसेच्या बुडीत क्षेत्रालगत आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पात गेली, तर अनेक शेतकऱ्यांची बुडीत क्षेत्रालगत शेती आहे. बॅकवॉटर कोठपर्यंत येणार याचे सीमांकन करण्यात आले होते. शेतापासून सीमांकनाचा दगड दूर असल्याने शेतकरी धानाची बिनधास्त रोवणी करतात. मात्र गत तीन वर्षांपासून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी वाढली की दवडीपार येथील शेतात पाणी शिरते.
आता धान कापणीला आला आहे. मात्र, शेतात दोन ते तीन फूट पाणी आहे. शेतात जाणेही कठीण आहे. धान जागेवरच सडू देण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सांगा शेतात कसे जायचे?
- शेताच्या चहूबाजूने बॅकवाटर आहे. धानाच्या बांधितही पाणीच पाणी आहे. परिसरात धान कापणी जोमात सुरू आहे. आमच्या शेतात धान सडत आहे. यावर्षी पाणी शिरणार नाही असे समजून आशेने लागवड करतो; पण ऐन हंगामात पाणी शिरते. आता धान कापणीसाठी शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
डोळ्यांदेखत धान सडतो पाण्यात
गोसेच पाणी शिरले की, बांधित सतत पाणी राहते. त्यामुळे धान भरत नाही. सततच्या पाण्याने धान जागेवरच सडते, असे शेतकरी सांगतात. रामकृष्ण वाढ, खुशाल सेलाेकर, गजानन सेलोकर, पांडुरंग कुथे, देवराव कुथे, गंगाधर ठवकर, अशोक वैद्य, जगदीश ठवकर यांच्यासह सुमारे २० शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मोबदला मिळावा म्हणून गोसे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही.
मोठा खर्च करून धानाची राेवणी करतो, मात्र बॅकवॉटर शेतात शिरते आणि मोठे नुकसान होते. तीन वर्षांपासून धान पिकाचे नुकसान होत आहे. मात्र शासनाने एकदाही मदत दिली नाही. चुकीच्या सर्वेक्षणाचा आम्हा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी.
रामकृष्ण वाठ, शेतकरी, दवडीपार