गोसेच्या बॅकवाॅटरने भंडारा जिल्ह्यातील वरठीत नळाला येतेय काळे-पिवळे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 07:45 AM2022-03-31T07:45:00+5:302022-03-31T07:45:02+5:30
Bhandara News गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे.
भंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे. नाग नदीच्या दूषित पाण्याचा फटका बसत असून, २० हजारांवर नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या प्रकाराची तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी वरठीत धाव घेतली.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे जिल्ह्यातील पहिले जलशुद्धिकरण केंद्र वरठी येथे २०२१मध्ये सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून जवळपास २० हजार नागरिकांना २,२०० नळजोडणीच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा केला जात होता. वैनगंगा नदीच्या तीरावर खमाटा येथे नळ योजनेची विहीर असून, पाचगाव फाट्यावर जलशुद्धिकरण केंद्र आहे. मात्र, गत आठ दिवसांपासून नळाला येणारे पाणी पिवळसर - काळसर असल्याचे दिसून आले. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर हा प्रकार सुरू असल्याने ग्रामपंचायतीकडे तक्रार देण्यात आली. ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाला असेल म्हणून शोधाशोध केली. तुरटी, ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्ध करण्याचा प्रकार केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही.
अधिकाऱ्यांकडून पाहणी
ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मंगळवारी तक्रार दाखल केली. बुधवारी अभियंता दिनेश देवगडे, शाखा अभियंता खेडकर यांनी वरठी येथे येऊन जलशुद्धिकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी सरपंच श्वेता येळणे, सदस्य सीमा डोंगरे, ग्रामविकास अधिकारी दिगांबर गभणे आदी उपस्थित होते. जलशुद्धिकरण केंद्राच्या पाण्यावरही हिरवा तवंग आला असून, पाणी काळसर दिसत आहे. बॅक वाॅटरमुळेच वरठी येथे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती पुढे आली. पाण्यात लोहाची मात्रा अधिक असून, ब्लिचिंगच्या संपर्कात आल्याने पाणी पिवळे होत असल्याची माहिती देण्यात आली.
पाण्याची पर्यायी व्यवस्थाच नाही
वरठी हे २० हजार लोकसंख्येचे गाव असून, येथे सनफ्लॅग हा मोठा उद्योग आहे. नळयोजनेचे पाणी येथील नागरिकांसाठी एकमेव पर्याय आहे. गावात असलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.