राष्ट्रीय प्रकल्पामधून गोसीखुर्द वगळले
By admin | Published: August 19, 2016 12:36 AM2016-08-19T00:36:54+5:302016-08-19T00:36:54+5:30
पूर्व विदर्भासाठी हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पांच्या यादीमधून वगळून विदर्भाचे मोठे नुकसान केंद्र शासनाने केले आहे.
पत्रपरिषद : प्रफुल पटेल यांची माहिती
पवनी : पूर्व विदर्भासाठी हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पांच्या यादीमधून वगळून विदर्भाचे मोठे नुकसान केंद्र शासनाने केले आहे. प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची क्षमता राज्य शासनाची नाही. त्यामुळे राष्ट्रीय प्रकल्पात समावेश करून केंद्राचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे कार्य आपण केलेले होते, अशी माहिती राज्यसभा सदस्य तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी पत्रपरिषदेत दिली.
अच्छे दिनची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या समस्यांना समजून घेतले नाही. शेतमालाला भाव, भारनियमन सिंचनाच्या सोयी याकडे शासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास साधला जातो, परंतु गोंदिया-भंडारा-रामटेक क्षेत्रातील पर्यटन क्षेत्र विकासाकरीता मंजूर केलेला निधी नामंजुर करण्याचे धाडस या सरकारने केले. यावरून विकास प्रत्यक्ष न करता स्वप्न तेवढे दाखविले जात आहे. पवनी तालुक्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील बाधीत गावांचा प्रश्न, त्यांच्यावर होणारे हिस्त्र प्राण्यांचे हल्ले यावर चिंता व्यक्त करून केंद्र शासनाकडे गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेटनार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. नागपूर-नागभिड नॅरोगेज रेल्वेचे ब्राडगेजमध्ये रूपातंर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र अशा काही समस्या निवडणून पाठविलेल्या लोकप्रतिनिधींनी हाताळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी दिला. पत्रपरिषदेला आ. राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार, राष्ट्रवादी काँगे्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, तालुकाध्यक्ष लोमेश वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी उपाध्यक्ष पंढरी सावरबांधे, शहराध्यक्ष डॉ. अनिल धकाते व पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)