आसोला मेंढा तलावात सोडले गोसेखुर्दचे पाणी
By Admin | Published: September 13, 2015 12:28 AM2015-09-13T00:28:43+5:302015-09-13T00:28:43+5:30
पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे.
पवनी/गोसेखुर्द : पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतीला गोसीखुर्द धरणाच्या पाण्याने सिंचन होण्याकरीता गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. ९९ कि.मी. लांबीच्या या कालव्यातून गोसीखुर्द धरणाचे पाणी आज संध्याकाळ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा तलावात पोहचणार आहे.
गोसीखुर्द धरणामुळे सिंचन, पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा व जल विद्युत निर्मिती होणार आहे. शासनाने ठरविल्या प्रमाणे गोसीखुर्द धरणाद्वारे ‘वैनगंगेचे पाणी शेतकऱ्यांचे अंगणी’ पोहचविण्याचे धोरण आहे.
गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे एकुण ९९ कि.मी. पर्यंतची कामे सुरु असून मातीकाम व बांधकामे बहुतांश पुर्ण झालेली आहेत. या कालव्याच्या कामाची किंमत ५,१८९ कोटी आहे. उजव्या कालव्याद्वारे ६४,३६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मार्च २०१५ अखेर ९,४२० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४,४०२ हेक्टर सिंचनक्षमतेचे उद्दीष्ट आहे. सन २०१४-१५ मध्ये १,२७२ हेक्टर प्रत्यक्ष सिंचन करण्यात आले आहे.
शेतीला गोसीखुर्द धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात देवून सिंचन करण्याकरीता नियोजन करण्यात येत आहे. या करीता धरणाच्या उजव्या कालव्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील आसोलामेंढा तलावात पाणी सोडण्याचे ठरविण्यात आले. याकरीता मागील आठ दिवसापासून धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे बंद करून धरणातील जलस्तर वाढविला जात आहे.
मागील दोन दिवसांपासून उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. आज शनिवारला सकाळी ११ वाजता ७० कि.मी. अंतरापर्यंत पाणी पोहचले होते. संध्याकाळी ९९ कि.मी. अंतरावरील आसोलामेंढा तलावात पाणी पोहचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय होणार आहे. (शहर प्रतिनीधी/वार्ताहर)