६८ हजार बालकांना गोवर-रूबेलाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:06 PM2018-12-01T22:06:20+5:302018-12-01T22:06:36+5:30
जिल्ह्यातील ६८ हजार बालकांना गोवर-रुबेला चे लसीकरण करण्यात आले असून या लसीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम निदर्शनास आले नाही. २७ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी तज्ज्ञ व डॉक्टरांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील ६८ हजार बालकांना गोवर-रुबेला चे लसीकरण करण्यात आले असून या लसीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम निदर्शनास आले नाही. २७ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी तज्ज्ञ व डॉक्टरांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात येत आहे.
नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून ही मोहीम राबविली जात आहे. २९ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात ६७ हजार ९५३ बालकांना लस देण्यात आली. सदर लस १०० टक्के सुरक्षित असून जिल्ह्यात कुठेही त्याचे दुष्परिणाम आढळून आले नाही. आपल्या बालकांना आवर्जून लस द्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.
गोवर रुबेला मोहिमेचा आढावा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात घेण्यात आला. या मोहिमेत जिल्ह्यातील २ लाख ६५ हजार ८५४ बालकांना लस देण्यात येणार आहे. ही मोहिम ४ ते पाच आठवडे चालणार आहे. या लसीमुळे बालकांची रोग प्रतिकार क्षमता वाढून गोवरमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण आणि कॉन्जनायटल रुबेला सिंड्रोमचे संभाव्य रुग्ण कमी केले जाणार आहे. या मोहीमेत ९५ टक्के लक्ष गाठण्याचे उद्दिष्ट आहे.