जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:41 AM2021-08-17T04:41:08+5:302021-08-17T04:41:08+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित स्वतंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित स्वतंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस.बी. भलावी, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. सोबतच ७५ खाटांचे रुग्णालय असणार आहे. आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून ३४.२४ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आल्याचे सांगितले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला आहे. सामान्य रुग्णालय येथे पेडियाट्रिक वाॅर्ड तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोरोनावर सध्या तरी ‘लस’ हे एकमेव औषध असून नागरिकांनी लस अवश्य घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू आहे. कर्जमुक्तीपासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना साहाय्य करण्यासाठी सुरू केलेल्या खावटी अनुदान योजनेत लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप सुरू आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांना विहित मुदतीत मजुरी वाटप करण्यामध्ये व नोंदणीकृत मजुरांचे आधारकार्ड नरेगाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यामध्ये भंडारा जिल्हा राज्यात प्रथम आहे. मत्स्यव्यवसाय शेतीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादनासोबतच मत्स्यव्यवसायाची पूरक व्यवसाय म्हणून निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सी.सी.टी.एन.एस. प्रणाली राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रणालीच्या आधारे भंडारा पोलीस विभागाने उत्तम काम करून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.
भंडारा जिल्ह्यात निसर्ग पर्यटनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून पर्यटक मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य स्थळांना भेटी देत आहेत. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोहोचविण्याची मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात आली. शेतकऱ्यांच्या बांधावर खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.
या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन स्मिता गालफडे व मुकुंद ठवकर यांनी केले.
बॉक्स
ई-पीक पाहणी प्रकल्प लाभदायक ठरेल.
ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी झाला असून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा नुकताच शुभारंभ झाला आहे. ई-पीक पाहणीमुळे पिकांच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प शेतकरी बांधवांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.