भूविकास बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची अखेर शासनाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:53+5:302021-02-10T04:35:53+5:30
भंडारा : गत बारा वर्षांपासून शासनाकडे अडकून पडलेल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भूविकास बँक कर्मचाऱ्यांच्या १८ कोटी ४ लक्ष रुपयांच्या ...
भंडारा : गत बारा वर्षांपासून शासनाकडे अडकून पडलेल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भूविकास बँक कर्मचाऱ्यांच्या १८ कोटी ४ लक्ष रुपयांच्या थकबाकी संदर्भात भंडारा येथे सातत्याने भूविकास बँक कर्मचारी कृती समितीच्या वतीने काँग्रेसचे नेते डॉ. विनोद भोयर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनाची अखेर शासनाने दखल घेतली. यासंदर्भात नुकतीच मंत्रालयात सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली. यात भूविकास बँक कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विनोद भोयर यांनी प्रशासनासमोर गेल्या बारा वर्षांपासून भूविकास बँक कर्मचाऱ्यांची थकबाकी न मिळाल्याने त्यांच्या नशिबी आलेल्या दारुण, हृदय विदारक परिस्थितीची कल्पना मंत्र्यांना व प्रशासनाला करून दिली व त्यांना या दारुण परिस्थितीतून बाहेर काढण्याची विनंती केली. तसेच भूविकास बँक कर्मचाऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली.
या मागणीला पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू असे आश्वासन दिले तसेच वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना या बाबतीत धारेवर धरले. पंधरा दिवसात अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. बैठकीला महाराष्ट्राचे सहकार आयुक्त प्रदीप बर्गे, नागपूर विभागाचे उपनिबंधक कदम, जिल्ह्याचे उपनिबंधक देशकर तसेच भूविकास बँक कर्मचारी कृती समितीचे ब्रम्हपाल चौरे, अमरदीप बोरकर, नांदुरकर, राखडे उपस्थित होते.