शासकीय धान खरेदीला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 05:00 AM2021-10-31T05:00:00+5:302021-10-31T05:00:38+5:30
भंडारा जिल्ह्यामध्ये गतवर्षी अनियमितता झाली नाही अशा शंभर केंद्रांना धान खरेदी मंजुरीचे आदेश देण्यात आले आहे. शेतकरी हिताचा विचार करून दिवाळीनंतर आवश्यक केंद्रांमध्ये आणखी वाढ होणार आहे. दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथील धान खरेदी केंद्राचा शुभारंभ रविवारी होणार असून यानंतर जिल्ह्यातील इतर केंद्रांवरही धान खरेदी केंद्रांना प्रारंभ होणार आहे. धानाचे हमीभाव १,९४० रुपये असून याच दराने खरेदी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होणार की नाही अशी शंका असताना शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील शंभर केंद्रांना मंजुरीचा आदेश धडकला. त्यावरून रविवार ३१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राला प्रारंभ होणार आहे. साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे रविवारी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. धान खरेदी सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गत महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या घरी हलक्या वाणाचा धान येवू लागला होता. मात्र धान खरेदी कधी सुरू होणार याची अनिश्चितता होती. भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांना आता यश आले असून शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील १०० धान खरेदी केेंद्रांना मंजुरीचे आदेश देण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये गतवर्षी अनियमितता झाली नाही अशा शंभर केंद्रांना धान खरेदी मंजुरीचे आदेश देण्यात आले आहे. शेतकरी हिताचा विचार करून दिवाळीनंतर आवश्यक केंद्रांमध्ये आणखी वाढ होणार आहे. दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथील धान खरेदी केंद्राचा शुभारंभ रविवारी होणार असून यानंतर जिल्ह्यातील इतर केंद्रांवरही धान खरेदी केंद्रांना प्रारंभ होणार आहे. धानाचे हमीभाव १,९४० रुपये असून याच दराने खरेदी केली जाणार आहे. मात्र अद्यापही शासनाकडून बोनस बाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. गतवर्षी ७०० रुपये बोनस दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. आता राज्य शासन बोनसची घोषणा केव्हा करणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होत असली तरी शेतकऱ्यांना विकलेल्या धानाचा पैसा मात्र दिवाळीपुर्वी मिळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांना आपला धान व्यापाऱ्यांनाच विकावा लागणार आहे. व्यापारी गत काही दिवसांपासून १५०० ते १६०० रुपये प्रती क्विंटल दराने धानाची खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दिवाळी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागेल. मात्र धान खरेदीने अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासाही मिळणार आहे.
धान खरेदीत एसओपी ठरू शकते अडसर
- आधारभूत धान खरेदी केंद्रावर संपूर्ण प्रिक्रिया स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरने (एसओपी) करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी या प्रणालीने खरेदी झाल्यास अनेक केंद्रांना फटका बसू शकतो. तुर्तास शंभर केंद्रांना परवानगी देण्यात आली असली तरी एसओपीमध्ये किती केंद्र नियमात बसतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- आधारभूत खरेदी केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचेच धान खरेदी केले जाणार आहे. जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे.