चार महिन्यांपासून निराधार वृद्धांकडे शासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:33+5:302021-09-25T04:38:33+5:30
लाखनी : " बापू चार महिने झाले ... पुस्तकात पैसे नाही आले... बँकेचे साहेब म्हणतेत, बुढे..! घरी जा.. पैसे ...
लाखनी : " बापू चार महिने झाले ... पुस्तकात पैसे नाही आले... बँकेचे साहेब म्हणतेत, बुढे..! घरी जा.. पैसे नाही आले! तूच सांग बापू... आम्ही का खाऊन, न कसा जगून...!"६० ते ६५ वर्षांच्या थकलेल्या, डोळ्यातून आसवे येत असलेल्या एका वृद्ध आजीबाईंची होणारी परवड पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू आल्यावाचून राहणार नाहीत परंतु शासनाकडून मात्र हे वृद्ध चार महिन्यांपासून दुर्लक्षित आहेत त्यांच्या व्यथा या शासन दरबारी पाेहोचत नाहीत.
अनेक महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाखनी तालुक्यातील वृद्ध तसेच निराधार, अपंग ज्येष्ठ नागरिकांचे मानधन गत चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने हजाराहून अधिक नागरिकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्या निराधारांना किमान शासनाने तरी आधार देण्याची गरज आहे.
तळागाळातील नागरिकांचा विचार करुन शासन वेगवेगळ्या योजना राबवत असल्याच्या घोषणा शासनस्तरावर होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अनेक लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत. लाखनी तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वृद्ध, दिव्यांग, अविवाहित, महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार अशा दारिद्र्य रेषेखालील हजाराहून अधिक लाभार्थ्यांचे अनुदान गत चार महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. या योजनांचे तालुक्यात २१ हजार ९४० लाभार्थी असून, प्रती लाभार्थ्यांना मासिक एक हजार रुपयांप्रमाणे अनुदान तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागामार्फत दिले जाते.
दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने अनेक लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले आहेत. त्यामध्ये चार महिन्यांपासून संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे मिळाले नाहीत. शासनाकडूनच निधी न आल्याने वितरण करता आले नाही, असे सांगण्यात येत आहे. सण उत्सवाच्या काळात लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच आली. काही लाभार्थी शासनाकडून मिळणाऱ्या या मानधनावरच अवलंबून असल्याने त्यांची दमछाक होत आहे. शासनाकडून आधीच तुटपुंजे अनुदान अन तेही महिनोमहिने मिळत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण आहे.
कोट
"चार महिन्यांपासून मानधन न आल्याने वृद्ध, निराधार लोकांना मानधनाअभावी आपले जीवन कंठित करावे लागत आहे. याबाबत वृद्ध निराधार नागरिक वेळोवेळी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून याकडे मात्र महसूल प्रशासनातील कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या खात्यात लवकरात लवकर मानधन जमा करावे व त्यांची पिळवणूक थांबावी."
....धनंजय घाटबांधे, तालुकाध्यक्ष, भाजपा लाखनी.