गोदामाअभावी शासकीय धान खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:08+5:302021-01-08T05:55:08+5:30
आसगाव (चौ.) : पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील धान खरेदी गोदामाअभावी ठप्प झाली आहे. आसगाव, चकारा, गोसे, पवनी, कोंढा, सावरला, ...
आसगाव (चौ.) : पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील धान खरेदी गोदामाअभावी ठप्प झाली आहे. आसगाव, चकारा, गोसे, पवनी, कोंढा, सावरला, सिंदपुरी येथील गोदाम फुल्ल झाल्याने शेतकऱ्यांचा धान घरीच पडून आहे.
आसगाव परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा धान काढून झाला आहे. आधारभूत केंद्रावर सुरुवातीला धानाची वेगाने खरेदी करण्यात आली. मात्र, आता परिसरातील सर्व धान गोदाम फुल्ल झाले आहेत. धान ठेवायला जागा नसल्याने खरेदी ठप्प झाली आहे. धान विकला गेला नाही तर पैसे कसे येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता आपला धान व्यापाऱ्यांना विकण्याची तयारी चालविली आहे.
बाॅक्स
धान उचलण्याचे आदेशच नाही
आधारभूत केंद्रावर धानाची खरेदी झाली तरी अद्यापपर्यंत धान उचलण्यासाठी राईस मिल मालकांना आदेश मिळाले नाही. याबाबतची निविदा प्रक्रिया अद्यापही झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान मोजणी ठप्प झाली आहे. यासोबतच काही ठिकाणी बारदान्याचीही समस्या दिसून येते. तत्काळ धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी आहे.