आरक्षण बदलले तर सरकार बदलेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 09:58 PM2017-11-05T21:58:10+5:302017-11-05T21:58:22+5:30
मुंबई येथील इंदू मिल परिसरात बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी प्रधानमंत्री आले असता त्यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही,....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुंबई येथील इंदू मिल परिसरात बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी प्रधानमंत्री आले असता त्यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे विनाकारण अधूनमधून उठणाºया वावटळ्यांवर विश्वास ठेऊ नका, ज्यादिवशी आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. त्यावेळी मी तुमच्यासोबत राहीन, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला दिली.
आंबेडकरी विचार जागृती समितीच्यावतीने भंडारा येथे रविवारला आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलनात ते उद्घाटप्रसंगी बोलत होते. ना.आठवले हे संपूर्ण भाषणात बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून सांगितला, मात्र आरक्षणाविषयी काही बोलले नाही, त्यामुळे उपस्थितांमधून ‘आरक्षणावर बोला’, ‘आरक्षणावर बोला’ असे म्हणताच त्यांनी माईक पुन्हा हातात घेतला आणि वरील उद्गार काढले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य अनुसूचित जातीजमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल. थुल होते. यावेळी मंचावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, समता सैनिक दलाचे अध्यक्ष डी.एफ. कोचे, निमंत्रक अमृत बन्सोड, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर उपस्थित होते.
यावेळी ना.आठवले म्हणाले, बाबासाहेब आयुष्यभर सामान्य माणसांसाठी संघर्ष करीत राहिले. समाजात समता रूजली पाहिजे, विषमता संपली पाहिजे, असे सांगत राहिले. त्यांनी समाज जोडण्याचाच विचार दिला. पाणी अडवलं तर सिंचन वाढेल, शेतमालाला भाव मिळेल, उद्योग वाढले तर रोजगार मिळेल, पर्यायाने समाजात आर्थिक सुबत्ता यावी, असा विचार बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेब हे विचारांचे धनी होते. त्यांचा कार्यकर्ता होणे हे मी माझे भाग्य समजतो, असे सांगण्यासाठी विसरले नाही.
यावेळी माजी न्यायमूर्ती थूल म्हणाले, समाजात ऐक्य आवश्यक आहे. संघटीत झाल्याशिवाय संघर्ष नाही. त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. कोणतेही सरकार आले तरीही आरक्षण हटू शकत नाही, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, विधी शाखेशी संबंधित असल्यामुळे हे मी आवर्जून सांगत असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी प्रा.अश्ववीर गजभिये लिखीत पुस्तकाचे लोकार्पण ना.आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात ‘आरक्षणाचा प्रश्न, बौद्ध व मागासवर्गीयांच्या सवलती’ विषयावर माजी न्यायाधीश अनिल वैद्य ‘बौद्ध विवाह व वारस हक्क कायद्याची अपरिहार्यता’ या विषयावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत तर ‘बौद्ध संस्कृती संवर्धनाचा प्रश्न’ या विषयावर पर्यटन विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांचे व्याख्यान झाले.
संमेलनाचा समारोप सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. अतिथी म्हणून माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, साहित्यिक डॉ.अनिल नितनवरे उपस्थित होते.
आठवलेंनी एैकविल्या कविता
‘आज आले आमचे भरून मन’, ‘भंडाºयात होत आहे आंबेडकरी संमेलन’ असे म्हणत भाषणाला सुरूवात करीत ना.आठवले म्हणाले, या संमेलनात पक्षभेद विसरून सर्वजन एकत्र आल्याचा आनंद होत आहे. मी आंबेडकरी कार्यकर्ता असून एका कार्यकर्त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आयोजकांचा आभारी असल्याचे सांगून ‘समतावादी आहे आंबेडकरी विचार’ गावागावांत जावून करा त्याचा प्रचार’ असेही कवितेद्वारे त्यांनी सांगितले.