ग्रा.पं. पदाधिकारी योजनांपासून अनभिज्ञ
By admin | Published: October 14, 2015 12:40 AM2015-10-14T00:40:37+5:302015-10-14T00:40:37+5:30
गावचा विकास करावयाचा असेल तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना शासनाचे ध्येय-धोरण काय आहेत,..
प्रशिक्षणाची गरज : उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज
मोहन भोयर तुमसर
गावचा विकास करावयाचा असेल तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना शासनाचे ध्येय-धोरण काय आहेत, ते कसे राबवायचे यातून गावाचा विकास कसा करावयाचा याबाबत सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. परंतु, नवीन सरपंच, सदस्यांना याबाबतची माहिती नसल्याने गावाचा अपेक्षित असा विकास होऊ शकत नाही.
याबाबतचे प्रशिक्षणही वेळोवेळी शासनस्तरावर सुरू असते. परंतु या प्रशिक्षणाला आवश्यक त्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाच्या योजना व गावातील आवश्यक सुधारणा यांचा समन्वय साधता आला तर गावाच्या विकासाला कोणी रोखू शकत नाही.
शासनाच्या योजना गावात राबविणे आणि त्यात सहभागी होणे, शासनाच्या योजनांमध्ये उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी लाखो रुपयांचे पुरस्कारही दिले जातात. या सर्व बाबींचा योग्य वापर करून घेतल्यास गावाच्या विकासासोबतच लाखो रुपयांचे पुरस्कारही प्राप्त करता येऊ शकते.
ते कसे मिळवायचे याचे नव्याने निवडून आलेल्या गावातील ग्रामसदस्य, सरपंच यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना ग्रामसेवकाला लेखी स्वरूपात पंचायत समितीकडून देण्यात येतात. या योजनेची माहिती अनेक गावात ग्रामसभेतून दिलीच जात नाही. सरपंच सदस्य यांनासुद्धा ही माहिती पुरविली जात नाही. मोजक्याच शेतकऱ्यांना माहिती देऊन मोकळे होतात.
अशी अनेक उदाहरणे ग्रामीण भागात दिसून येतात. यामुळे संपूर्ण गावाचे नुकसान होते. अनेक प्रशिक्षण, माहिती, जनजागृती आदी संबंधितांची कामे ही कृषी कार्यालय व वनविभाग कागदोपत्रीच राबवित आहेत. काही मर्जीतील लोकांनाच याबाबतची माहिती देऊन कामे उरकविली जात आहेत. त्यामुळे गाव विकासाबाबत सरपंचासह ग्रामसदस्य व गावकरी अनभिज्ञ राहतात. परिणामी गावाचा विकास होत नाही. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
यासंदर्भात काही सरपंचांसोबत संपर्क साधला असता त्यांनी प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. गावाच्या विकासासाठी नियमित प्रशिक्षण मिळाल्यास गावाचा विकास होईल असे मत काहिंनी व्यक्त केले. ग्रामविकासात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील गावांचा दौरा सरपंच, सदस्यांसाठी काढण्यात यावा. अशा अभ्यास दौऱ्यांचा गावांच्या विकासासाठी लाभ होईल.