लिपिकवर्गीयांचा ग्रेड पे दुरूस्ती होणार
By admin | Published: July 17, 2017 12:28 AM2017-07-17T00:28:00+5:302017-07-17T00:28:00+5:30
लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर तिसऱ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे. त्यामुळे वेतनात मोठी तफावत आहे.
संघटनेच्या लढ्याला यश : ग्रामविकास सचिवांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर तिसऱ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे. त्यामुळे वेतनात मोठी तफावत आहे. याबाबत लिपिकवर्गीय संघटनेने प्रशासनाकडे अनेकदा निवेदन व चर्चांमधून कैफियत मांडली. मात्र, यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे लिपिकवर्गीय संघटनेने पुन्हा एकदा त्यांची बाजू मांडली. यावर ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी ग्रेड पे दुरूस्ती प्रस्ताव ३१ जुलैपूर्वी सादर करण्याचे आश्वासन दिले.
लिपिकवर्गीय संघटनेचे नेतृत्व मुख्यसचिव बापूसाहेब कुलकर्णी, राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नरेंद्र बुटके यांनी केले. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने विधान परिषद उपसभापती तथा समिती प्रमुख माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार रामहरी रूपनवर, ग्रमाविकास सचिव असीम गुप्ता, उपसचिव जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची ग्रेड पे संदर्भात साक्ष झाली. यावेळी संघटनेच्या वतीने मांडलेल्या समस्येनंतर सदर आश्वासन देण्यात आले.
यावेळी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कैफियतनुसार, त्यांच्यावर खरोखरचं अन्याय झाल्याचे विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मान्य केले. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना तिसऱ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे. त्यामुळे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची वेतन त्रृटी ६ व्या वेतन आयोगातच दुरूस्ती करावी. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड पे बाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले. यावर असिम गुप्ता यांनी समितीसमोर कर्मचाऱ्यांचे ग्रेड पे दुरूस्ती प्रस्ताव ३१ जुलै अखेर सादर करू असे आश्वासन दिले.
यावेळी लिपिकवर्गीय संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष केशरीलाल गायधने, भंडारा जिल्हाध्यक्ष प्रभू मते, जिल्हासचिव यशवंत दुनेदार यांच्यासह सागर बाबर, अरूण जोर्वेकर, स्वप्नाली माने, मारोतीराव जाधव, राजेंद्र ठाकरे, नितिन सहारे, संतोष राठोड, सचिन बिदरकर, निलेश दुमोरे, दीपक दुबे आदी उपस्थित होते.