दोन महिन्यांपासून धानाचे चुकारे थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:34 AM2021-03-21T04:34:54+5:302021-03-21T04:34:54+5:30
गोठणगाव : आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करून तीन महिन्यांचा कालावधी लोटला मात्र त्यांना अद्यापही धानाचे ...
गोठणगाव : आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करून तीन महिन्यांचा कालावधी लोटला मात्र त्यांना अद्यापही धानाचे चुकारे मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. तर चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे पीक कर्जसुध्दा थकीत होण्याच्या मार्गावर आहे.
एकात्मिक आदिवासी विकास उपविभाग नवेगावबांध अंतर्गत आदिवासी सेवा सहकारी संस्था गोठणगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. ऑक्टोबर २०२० पासून केंद्र सुरू आहे. पहिला हप्ता १८ जानेवारीपर्यंत हुंड्या काढून चुकारे देण्यात आले. मात्र १९ जानेवारीपासून आतापर्यंत धानाचे चुकारे देण्यात आले नाही. सेवा संस्थेने दोन महिन्याचे हुंड्या काढून आदिवासी विकास महामंडळाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. निधीअभावी चुकारे अडले असल्याचे संस्थेकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. परंतु नियमित कर्ज परतफेड करण्याची मुभा ३१ मार्च असते. त्यामुळे शेतकरी थकीत होण्याची शक्यता आहे. संस्थेकडून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. ३१ मार्चनंतर कर्जावर व्याजाची आकारणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकलेले जाईल, अशी चिंता सतावित आहे. त्याकरिता शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांचे चुकारे त्वरित देण्याची मागणी केली जात आहे.