२७ हजार कुटुंबांना धान्य वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:16+5:30
तालुक्यातील ५५ हजारापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या लाभार्थ्यांची संख्या ३८५ आहे. यातील ७८ हजार ४५० व्यक्तींना प्रतीव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. केशरी शिधापत्रिका असलेले दोन हजार ७८६ कुटुंबिय तालुक्यात आहेत. आतापर्यंत १३ हजार ४४४ व्यक्तींना शिधा पुरविण्यात आला आहे. लाखनी तालुक्यात पांढरे कार्ड असलेले लाभार्थी कुटुंब संख्या दोन हजार १८९ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याने अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. या कालावधीत कोणत्याही कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये लाखनी तालुक्यात पिवळी शिधापत्रिका असलेल्या अंत्योदय योजनेचे सात हजार ९२३ लाभार्थी कुटुंबिय आहेत. यातील ३१ हजार ४८५ लोकांसाठी प्रती कुटुंबासाठी १६ किलो गहू व १९ किलो तांदूळ शासनाकडून पुरविण्यात येत आहे.
तालुक्यातील ५५ हजारापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या लाभार्थ्यांची संख्या ३८५ आहे. यातील ७८ हजार ४५० व्यक्तींना प्रतीव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. केशरी शिधापत्रिका असलेले दोन हजार ७८६ कुटुंबिय तालुक्यात आहेत. आतापर्यंत १३ हजार ४४४ व्यक्तींना शिधा पुरविण्यात आला आहे. लाखनी तालुक्यात पांढरे कार्ड असलेले लाभार्थी कुटुंब संख्या दोन हजार १८९ आहे. यामध्ये पाच हजार ५०७ व्यक्तींचा समावेश आहे. पांढरे कार्ड असलेल्या पगारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. मात्र तालुक्यात पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना साखर, तूरडाळ, चनाडाळ शासनाकडून पुरविण्यात येत आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लॉकडाऊन दरम्यान प्रती कुटुंबाला पाच किलो तांदूळ मोफत देण्याच्या सूचना दिल्या आाहेत. तालुक्यात नियमित शिधावाटप झाल्यानंतर मोफत तांदळाचे वितरण होणार आहे. तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे निवेदन पाठविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असताना स्वस्त धान्य दुकानदार आपले जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावित आहेत. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांच्या कुटुंबियांसह सर्वांना विम्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.
लाखनी तालुक्यातील १०८ प्राधिकृत स्वस्त धान्य विक्री केंद्र आहेत. अनेक दुकाने, महिला बचत गट, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, अपंग व मजूर संस्थांना चालविण्यासाठी दिले आहेत. या सर्वांना विम्याचा लाभ देण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
तालुक्यात शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींची संख्या अधिकृत नाही. अनेक कारणांमुळे शिधापत्रिका तयार करावयाचे काम थांबले आहे. तालुक्यात मजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबियांची संख्या लक्षणीय आहे. नहराच्या कामासह इतर कामासाठी परप्रांतात अनेकजण कामासाठी जातात. यांना शासनाच्या विविध योजनांसाठी कागदपत्रे सादर करताना अडचणी येतात. तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील सर्व गावात कर्मचाऱ्यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरीत करण्यात येत आहे. तालुक्यात लॉकडाऊन दरम्यान कुणीही उपाशी राहू नये यासाठी ग्रामस्तरावर पोलीस पाटील, तलाठी तसेच तहसील कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.