गरजूंना धान्य वितरण आणि बेघरांची वसतिगृहात सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद आहे. या काळात गोर गरीबांचे हाल होवू नये. कुणीही अन्नधान्या वाचून अडचणीत येवू नये, यासाठी प्रशासनाने गोरगरीबांना जीवनाश्यक वस्तूचा पुरवठा सुरू केला आहे. तर जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या बेघरांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था वसतीगृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूचे दुकाने उघडी असली तरी हाताला काम नसल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. हा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार गोरगरीबापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याची व्यवस्था करीत आहेत. भंडारा शहरात उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनात शहरात विविध ठिकाणी धान्याचे पॅकेट वाटप केले जात आहे. तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने लाखांदूर तालुक्यातील गरजू व मजुरांसाठी एक क्विंटल तांदूळ देण्यात आले आहे.
शहरात असलेल्या बेघर व भिकाऱ्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था शासकीय वसतीगृहात करण्यात आली आहे. याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग प्रमाणे राहण्याची सोय असणार आहे. शहरातील विविध भागात असलेल्या अशा बेघर भिकाऱ्यांचे सर्व्हेक्षण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांना त्याठिकाणी हलविले जात आहे.
शिवभोजन केंद्र सुरू
कोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावाच्या शक्यतेने येथील जिल्हा परिषद उपहारगृहात असलेले शिवभोजन केंद्र बंद करण्यात आले होेते. मात्र शनिवारपासून सदर केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार शनिवारी केंद्र सुरू झाले. याठिकाणी सुद्धा सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात येणार आहे. या केंद्राची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रदीप काठोळे यांच्याकडे देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना संचारबंदीच्या काळात भोजन मिळावे, हा या मागचा उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या असून त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
विविध समन्वय समित्या
कोरोना उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी विविध समित्या गठित केल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू पुरवठा व व्यवस्थापन सनियंत्रण समिती, जनजागृती समिती, संपर्क शोधक समिती, तालुकास्तरीय सनियंत्रण समिती, वैद्यकीय व आरोग्य विषयक वस्तू व सेवापुरवठा समन्वय समिती, आंतरजिल्हा व आंतरराज्यीय समन्वय समिती, नागरिक भागातील व्यवस्थापन विषयक समिती गठित करण्यात आली आहे. जबाबदार अधिकाºयाची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना या साथ रोगाचा एकजुटीने मुकाबला करू या. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे व आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.