बारदानाच्या अभावाने धान्य खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:42+5:302021-01-04T04:29:42+5:30
मुखरू बागडे पालांदूर : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पालांदूर येथील सेवा सहकारी संस्था अंतर्गत धान खरेदी केंद्र सुरू ...
मुखरू बागडे
पालांदूर : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पालांदूर येथील सेवा सहकारी संस्था अंतर्गत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तेव्हापासून धान खरेदीला समस्यांचा सामना करावा लागत आहे. कधी गोदामाची समस्या तर कधी बारदान्याची समस्या शेतकऱ्यांच्या धान खरेदीला अडचणीची जात आहे. गत तीन दिवसापासून बारदाना तुटवड्याने धान खरेदी बंद पडली आहे.
पालांदूर येथील सेवा सहकारी संस्थेचे सर्वात मोठे धान खरेदी केंद्र म्हणून नावारूपास आलेले आहे. गोदामाची समस्या मात्र आ वासून उभी आहे. असे असताना संस्थेच्या माध्यमातून खासगी गोदाम भाडेतत्त्वावर घेऊन धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. दोन महिन्यात सुमारे ३४ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. दोन महिन्यात अजून धान उचलण्याचा आदेश (डीओ) देण्यात आला नाही. त्यामुळे गोडाऊन भरलेले आहेत. दोन-चार दिवसात धान उचलण्याचा आदेश न झाल्यास पुन्हा खरेदी प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे. दरवर्षीच धान खरेदीसाठी प्रशासनाकडून व्यवस्था तोकडी असते. जिल्ह्यातील काही तालुक्यात धान खरेदी केंद्राचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. केंद्राच्या माध्यमातून झालेल्या खरेदीचे तात्काळ भात गिरण्यांना अर्थात मिलर्सना देऊन गोडाऊन मोकळे करावे. जेणेकरून उर्वरित प्रभावित झालेली धान खरेदी सुरळीत करायला मोकळी होईल.
बारदाना अभावाने धान खरेदी बंद पडलेली आहे. जिल्हा मार्केटिंग कार्यालयला सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु दोन दिवसात बारदाना न मिळाल्याने नाईलाजाने धान खरेदी बंद पडलेली आहे. बारदाना मिळेपर्यंत धान खरेदी सुरू करता येणे कठीण आहे.
बॉक्स
४ कोटी ६६ लाखांचे चुकारे
पालांदूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अंतर्गत ९ नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. यात ३० डिसेंबरपर्यंत ३३ हजार ४५३.६० क्विंटल धान खरेदी झालेली आहे. यातील १८ डिसेंबरपर्यंत ८९३ शेतकऱ्यांचे २४ हजार ९७४ क्विंटल धानाचे चुकारे ४ कोटी ६६ लाख ५१ हजार ४३२ रुपये जमा झालेले आहेत. ३१८ शेतकऱ्यांचे ८,४७९.६० क्विंटल धानाचे एक कोटी ५८ लाख ३९ हजार ८९२ रुपये थकीत आहेत.
कोट
झालेल्या धान खरेदीच्या उचल याचा आदेश मिळणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अन्यथा बारदाना अभावाने तर पुढे गोदाम संकटाने धान खरेदी बंद राहील.
- विजय कापसे, अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था पालांदूर.