राशन दुकानदारांच्या अंगठ्यानेच धान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:16+5:302021-04-17T04:35:16+5:30
तालुक्यात १०८ स्वस्त धान्य दुकाने आहेत. प्रत्येक दुकानदार हा संपूर्ण गावाला धान्य वितरित करीत असतो. कोरोनाच्या ...
तालुक्यात १०८ स्वस्त धान्य दुकाने आहेत. प्रत्येक दुकानदार हा संपूर्ण गावाला धान्य वितरित करीत असतो. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात तीन महिने राशन दुकानदारांच्या थम्प प्रमाणित करून धान्य कार्डधारकांना देण्यात आले होते. परंतु या वर्षी म्हणजे दुसऱ्या टप्प्यात अजूनपर्यंत शासनाने कोणतेच निर्णय न घेतल्यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणत्या क्षणी कोरोनाचा बळी कोण पडेल हे सांगता येत नाही. मोहाडी, तुमसर, लाखांदूर तालुक्यात कोरोनाने दुकानदारांचा मृत्यू झाला आहे. बरेच जिल्ह्यातील दुकानदार पॉझिटिव्ह झाले आहे. लाखनी तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने येथील दुकानदार पॉझिटिव्ह झाले आहेत. आता धान्याचे वाटप कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासंबंधाने जिल्हा स्तरावर प्रशासनाला निवेदन देऊन राशन दुकानदारांच्या अंगठ्यानेच धान्य वितरण करण्याची मुभा देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. लाखनी तालुक्याची परिस्थिती पाहता येथील परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे दुकानदारांना व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात यावी अशी मागणी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष वाल्मीक लांजेवार व इतर दुकानदारांनी केली आहे.
बॉक्स
जिल्ह्याची परिस्थिती बघता सचिव अन्नपुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांना कळविले आहे. दुकानदारांना ऑफलाइन धान्य वितरण करण्याची परवानगी देण्यात यावे. निर्देश आले की कळविण्यात येतील.
अनिल बन्सोड
जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा