धानाचे चुकारे अडले, शेतकरी सावकारांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:46+5:302021-08-14T04:40:46+5:30
चुल्हाड ( सिहोरा) : उन्हाळी धानाचे चुकारे दोन महिन्यांपासून अडले असून खरिपाचे बोनसही अर्ध्येच शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. ...
चुल्हाड ( सिहोरा) : उन्हाळी धानाचे चुकारे दोन महिन्यांपासून अडले असून खरिपाचे बोनसही अर्ध्येच शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून त्यांना पैशांची तजविज करण्यासाठी थेट सावकारांच्या दारात पोहचण्याची वेळ आली आहे. रासायनिक खत कसे खरेदी करावे, असा प्रश्न त्यांच्या पुढे असून अनेक शेतकऱ्यांकडे मजुरांची मजुरीही थकली आहे. तत्काळ चुकारे मिळाले नाही तर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गत वर्षात खरीप हंगाम आधारभूत केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे रब्बीच्या हंगामात बोनसचे अर्धे पैसे मिळाले आहे. रबी धान विक्री केले असता चुकाऱ्याचा थांगपत्ता नाही. आता खरीप हंगामातील धानाची रोवणीही आटोपली आहे. रबी धानाचे चुकारे अडल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचभाई होत आहे. धान लागवडीचा खर्च वाढल्याचे सारेच शेतकरी हतबल आहेत. मजुरांची मजुरीही वाढत आहे. डिझेलचे दर आकाशाला भिडले आहे. ट्रॅक्टरचा ताशी दर एक हजाराच्या वर पोहचला आहे. दुसरीकडे खत तर आवाक्याचे बाहेर गेले आहेत. मजूर, ट्रॅक्टर मालक, खत विक्रेत्यांची थाप दारावर आली आहेत. शेतकऱ्याचे खिशात पैसे नाहीत. कोट्यवधीचे चुकारे लांबणीवर गेल्याने सणासुदीला शेतकरी बेजार झाले आहे. उन्हाळी चुकाऱ्यामुळे पीक कर्ज भरता आले नाही. यामुळे नवीन कर्ज मिळाले नाही. आता सावकाराच्या दारावर जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
बाॅक्स
दागिने गहाण ठेवण्याची वेळ
शेतकऱ्यांना पैशांसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. तुमसरमध्ये अनेक शेतकरी सावकाराचा शोध घेत आहेत. कर्जाच्या गर्तेत शेतकरी पुन्हा भरडला जात आहे. शेतकऱ्यांना कृषी केंद्र मालकांनी उधारीवर खत देणे नाकारले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी तणावात आले आहे.
बाॅक्स
रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
गेल्या दोन महिन्यांपासून रब्बी धानाचे चुकारे अडले आहेत. मजूर शेतकऱ्यांना मजुरीची मागणी करीत आहेत. सणासुदीचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांचे घरात सर्वच तणावात आले आहेत. शेतकऱ्यांची अवस्था चिंताग्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे देण्याची मागणी किशोर राहगडाले, डॉ मुरलीधर बानेवार, ग्रामपंचायत सदस्य शीतल चिंचखेडे, भाजयुमोचे विनोद पटले यांनी केली आहे. वेळेत धानाचे चुकारे मिळाले नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.