भोंग्यांचा दणदणाट, गावागावांत उडतोय प्रचाराचा धुरळा; ग्रा.पं. निवडणुकीचे वातावरण तापले

By युवराज गोमास | Published: December 14, 2022 05:20 PM2022-12-14T17:20:10+5:302022-12-14T17:21:52+5:30

थेट रणांगणावरील युद्धाचा आभास

Gram Panchayat election atmosphere heated up, voting on 18th december | भोंग्यांचा दणदणाट, गावागावांत उडतोय प्रचाराचा धुरळा; ग्रा.पं. निवडणुकीचे वातावरण तापले

भोंग्यांचा दणदणाट, गावागावांत उडतोय प्रचाराचा धुरळा; ग्रा.पं. निवडणुकीचे वातावरण तापले

googlenewsNext

भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीचा थेट बार आता उडू लागला आहे. शहरे शांत असली तरी ग्रामीण भागात भोंगे, बॅनर यांचे युद्ध रंगत चालले आहे. आणखी तीन दिवस रणधुमाळी सुरू राहणार आहे. काही शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक निवडणूक मैदानात असल्याने तेही छुप्या पद्धतीने कामाला लागले आहेत. एकंदर गावागावात प्रचाराचा धुरळा उडतो आहे. भोंग्यांच्या दणदणाटाने अनेकांची झोपमोड होत असून थेट रणांगणावरील युद्धाचा आभास होत आहे.

मोहाडी तालुका वगळता इतर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील ३०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात सदस्यपदांसाठी ६१०३ तर थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून येण्यासाठी १०४९ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढे राजकारण होत नाही, त्यापेक्षा अधिक जिद्द आणि कट्टरपणे ही निवडणूक लढवली जाते.

निवडणुकांच्या खर्चावर शासनाने मर्यादा घातली असली तरी त्यापेक्षा अधिक पैसा खर्ची घातला जात आहे. परंतु हिशेबाचे संतुलन राखण्याचे कसब समर्थकांना चांगलेच ठाऊक असल्याचे बोलले जाते. निवडणुकांत पैसा गैरवापर प्रभाव पाडणारा ठरतो आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळण्यासाठी निवडणूक विभागाची जबाबदारी वाढली आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी जागृत होत कार्यक्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. एकाचा फायदा आणि दुसऱ्याचे नुकसान असे होऊ नये, यासाठी वेळीच आवरणे गरजेचे आहे.

शहरालगतच्या निवडणुका बहुकोणीय

भंडारा शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बहुकोणी व चुरशीच्या निवडणुका होत आहेत. सरपंचपदासाठी पॅनलसोबत स्वतंत्र उमेदवारांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या रंगात सगळे जण न्हाऊन घेण्यास तयार आहेत. अनेक ठिकाणी शासकीय कर्मचारी उघडपणे निवडणुकीच्या प्रचारात आहेत. मोठ्या निवडणुकांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, मग ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अशांचा हस्तक्षेप मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा नाही का, असा प्रश्न आहे.

बदलला ट्रेंड, जाहीरनाम्यांचा पाऊस

पूर्वीचे बिल्ले आणि गाडीला बांधलेले भोंगे हद्दपार झाले असून आता मोठमोठे बॅनर व फ्लेक्सने जागा घेतली आहे. डीजेवर वाजणारे गाणे तरुणांना नाचविल्याशिवाय सोडत नाही. मोबाइलवरील सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रचार पराकोटीचा आहे. आता मतदारांनी आभासी पद्धतीने मतदान यंत्राचे बटन दाबावे, एवढेच काय ते शिल्लक आहे. लोकसभा, विधानसभेत जाहीरनामे झळकत होते, परंतु आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही उमेदवार जाहीरनामे देऊन मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Gram Panchayat election atmosphere heated up, voting on 18th december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.