ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने ग्रामीण वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:48+5:302021-01-08T05:54:48+5:30

भंडारा : लोकशाहीचा उत्सव असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला खऱ्या अर्थाने मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, १४८ ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू ...

The Gram Panchayat election campaign heated up the rural atmosphere | ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने ग्रामीण वातावरण तापले

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने ग्रामीण वातावरण तापले

googlenewsNext

भंडारा : लोकशाहीचा उत्सव असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला खऱ्या अर्थाने मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, १४८ ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत आपल्या गटाला निवडणुकीत यश मिळविण्यासाठी गावपुढारी कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत अविरोध झाली नसून, आता १२३६ जागांसाठी २७४५ उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून गावागावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोरोना संसर्गाच्या चर्चांची जागा आता ग्रामपंचायत निवडणुकीने घेतली. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली. त्यात तुमसर तालुक्यातील १८, मोहाडी तालुक्यातील १७, भंडारा तालुक्यातील ३५, पवनी २७, लाखनी आणि साकोली प्रत्येकी २० तर लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गावाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक जण इच्छुक असून, तब्बल ३,११७ व्यक्तींनी आपले नामांकन दाखल केले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३७१ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता १२३६ जागांसाठी २७४५ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी चिन्ह वाटप झाल्यानंतर मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला आहे.

अनेक गावात या निवडणुकीवरून दोन गट निर्माण झाले आहेत. आपल्या गटाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. गावाची मतदारसंख्या कमी असल्याने एकूणएक मत मिळविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्येक गावात लाॅकडाऊनच्या काळात कोरोना हा चर्चेचा विषय होता. मात्र आता कोरोनाची जागा ग्रामपंचायत निवडणुकीने घेतली आहे. निवडणुकीत उभे असलेल्यांसोबतच प्रत्येकाचा चर्चेचा विषय ग्रामपंचायत निवडणूक आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींसोबतच लहान गावांमध्येही प्रचंड चुरस दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पोहरा येथील प्रभाग ५ मधील सर्व उमेदवारांनी माघार घेत असल्याचे पत्र लाखनीचे तहसीलदार मल्लिक वीराणी यांना दिले आहे. मेंढा व गडपेंढरी ग्रामपंचायतीची स्वतंत्र निर्मिती करावी, मूलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. पोहराच्या प्रभाग ५ मध्ये मेंढा व गडपेंढरी गावाचा समावेश आहे.

आता बाहेरगावी असणाऱ्यांची मनधरणी

कोरोना संकटकाळात रोजमजुरीसाठी आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी गावात परत आली होती. त्यावेळी त्यांना गावबंदी करण्यात आली होती. अनेक गावात महानगरातून येणाऱ्या आपल्याच गावातील नागरिकांना १५ ते २० दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. आता निवडणुकीच्या काळात मात्र बाहेरगावी गेलेल्यांचे मत मिळावे यासाठी मनधरणी केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकेका मताला महत्त्व असते. त्यामुळे बाहेरगावी असलेल्या आपल्या गटाच्या व्यक्तीला मतदानासाठी गावात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. सुरुवातीला गावबंदी करणारे आता बाहेरगावी असणाऱ्यांसाठी पायघड्या घालत आहे.

Web Title: The Gram Panchayat election campaign heated up the rural atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.