मारहाण करून काढला ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा; महिल जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:08 PM2022-12-22T18:08:56+5:302022-12-22T18:11:15+5:30
लाखनी तालुक्याच्या पेंढरी येथील घटना
भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीत माझ्या पक्षातील उमेदवारांना मत दिले नाही. त्यामुळे उमेदवार निवडून आले नाही, असे म्हणीत एका महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना पालांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेंढरी येथे घडली. यात लता दिलीप घरडे या जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
निवडणूक निकालानंतर लता घरडे हे घराच्या अंगणात शेळ्या बांधून उभ्या होत्या. याचवेळी प्रदीप अंताराम शेंडे हा हातात काठी घेऊन तिथे आला. तसेच महिलेला ग्रामपंचायत निवडणुकीत माझ्या पक्षातील लोकांना मत दिले नाही म्हणून मारहाण केली.
यात महिलेला हातावर, पाठीवर व अन्य ठिकाणी मार बसला. तिच्या तक्रारीवरून पालांदूर पोलिसांनी प्रदीप शेंडे याच्याविरुद्ध भादंविच्या ३२४, ४४८ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार धांडे करीत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा मारहाण करून काढल्याची चर्चा बुधवारी दिवसभर ऐकावत होती.