ग्रामपंचायत सदस्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:42 PM2018-04-04T23:42:42+5:302018-04-04T23:42:42+5:30
मलिदा ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येणाऱ्या दलित वस्ती रस्ता बांधकामावर अरुण तितीरमारे याने दलित समाजाचे ग्रामपंचायत सदस्य दिनेश गेडाम याला विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मलिदा ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येणाऱ्या दलित वस्ती रस्ता बांधकामावर अरुण तितीरमारे याने दलित समाजाचे ग्रामपंचायत सदस्य दिनेश गेडाम याला विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असूनही पोलिसांनी अजुनपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही, अशी तक्रार सरपंच मनिषा गेडाम, दिनेश गेडाम, प्रफुल धुम्मनखेडे आदींनी पत्रपरिषदेतून केली असून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली.
अरुण मारोती तितीरमारे हा दलित वस्ती रस्ता व नाली बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आला. त्याने दिनेश गेडाम यांना कामावर बोलावले. ग्रामपंचायत सदस्य दिनेश गेडाम हे प्रफुल धुम्मनखेडे यांच्यासोबत सुरू असलेल्या कामावर गेले असता मारोती तितीरमारे याने मागील पुढील कोणताही विचार न करता दिनेश गेडाम यांना जातीवाचक व अश्लील शब्दात शिविगाळ करून मारहाण केली. त्यावेळी कामावर उपस्थित लोकांची भांडण सोडविले. ही घटना २५ मार्च २०१८ ला सायंकाळी ५ वाजता घडली.
ग्रामपंचयत सदस्य दिनेश गेडाम असून त्यांची पत्नी मनिषा गेडाम या मलिदा येथील सरपंच आहेत. अरुण तितीरमारे हा ग्रामपंचायतचा सदस्य किंवा पदाधिकारी नसताना ग्रामपंचायतच्या कामात ढवळाढवळ करतो. तो स्वत: गावाचा दादा असल्यासारखा भास निर्माण करून गावातील शांतता भंग करून आपआपसात भांडण लावण्याचे काम करीत असतो. दलित समाजाचे सरपंच व सदस्य असल्याने त्याने भांडण करताना दलित समाजाबद्दल अपशब्दांचा वापर केला व मारहाण केली. मलिदा गावातील नागरिक संज्ञान असून त्यांच्यात अजीबात जातीयवादाला धारा नाही. मात्र अरुण तितीरमारे हा गावात जातीय द्वेष पसरविण्याचा कार्य करीत आहे. दिनेश गेडाम यांना ठार मारण्याची भाषा वापरत असल्याने पोलिसांनी अरुण तितीरमारे याला त्वरीत अटक करावी, अशी मागणी पत्रपरिषदेतून सरपंच, सदस्य व काही ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणात आंधळगाव पोलिसांनी अरुण मारोती तितीरमारे (४८) यांच्याविरूद्ध भादंवि ३२३, २९४, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीने न्यायालयातून अटकपूर्व जामीन प्राप्त केलेला असल्याने जामिन रद्द होईपर्यंत अटक करता येत नाही.
-विक्रम साळी, उपविभागीय
पोलीस अधिकारी, तुमसर.