ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विकासावर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:46 PM2017-12-15T23:46:53+5:302017-12-15T23:47:42+5:30
पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या सुविधा ग्रामस्तरावर निर्माण करणे वापरासाठी ग्रामपंचायतस्तरावर नियोजन व योग्य अंमलबजावणी करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या सुविधा ग्रामस्तरावर निर्माण करणे वापरासाठी ग्रामपंचायतस्तरावर नियोजन व योग्य अंमलबजावणी करण्यात आली. तर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी व आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून आपला गाव स्वच्छ व सुंदर करता येईल. यासाठी नवनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सक्षमपणे नेतृत्व करावे, असे प्रतिपादन तुमसर पंचायत समितीचे उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा व पंचायत समिती तुमसर गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्य, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी यशदाचे मास्टर ट्रेनर वाळबुद्धे, मनुष्सबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार, राजेश येरणे, मास्टर ट्रेनर हेमंत भांडारकर, विस्तार अधिकारी घटारे, गट संसाधन केंद्राचे कर्मचारी शशिकांत घोडीचोर, हर्षाली ढोके, अनिता कुकडे, पाणी गुणवत्ता सल्लागार पोर्णिमा डुंभरे, ग्रामलेखा समन्वयक वर्षा दहीकर यांची उपस्थिती होती.
कोतपल्लीवार यांनी, नवनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना पाणी पुरवठा व स्वच्छतेबाबत देण्यात येणारे प्रशिक्षण फायदेशिर ठरणार असून मिळालेली माहिती व मार्गदर्शनाचा फायदा गावातील नागरिकांसाठी करून घ्यावा व भविष्यात होणाऱ्या प्रशिक्षणाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन केले.
यशदाचे मास्टर ट्रेनर बाळबुद्धे यांनी शासकीय योजना, पाणीपुरवठा व स्वच्छतेमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग, योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राबवावयाचे विविध उपक्रमाची तयारी, अंमलबजावणी याबाबत उदाहरणे देवून मार्गदर्शन केले.माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे यांनी, शासकीय योजना ग्रामस्तरावर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्तरावर घ्यावयाचा पुढाकार, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी राबवायचे विविध उपक्रमाची तयारी, अंमलबजावणी याबाबत उदाहरणे देवून मार्गदर्शक केले. माहिती शिक्षण संवादाच्या आधुनिक साधनाद्वारे जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत माहिती दिली. दोन दिवसीय कार्यक्रमाचे संचालन व आभार विस्तार अधिकारी घटारे यांनी केले.
प्रशिक्षणाचा लाभ गाव विकासाला
नाकाडोंगरीचे सरपंच सरिता कोतपल्लीवार यांनी, प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करून प्रशिक्षणातून मिळालेल्या धड्यातून ग्रामस्तरावर कार्य करताना फायदा होणार असल्याचे सांगितले व अशाच प्रकारचे प्रशिक्षण भविष्यात घेण्याचा आशावाद व्यक्त केला.
राजापूरचे ग्रामपंचायत सदस्य भैसारे यांनी, प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती शिक्षित होत असतो त्यासाठी दररोज कामयाब होण्याचे आवाहन केले. राष्ट्रगिताने प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.
अंकुश गभणे यांनी, लोकसहभागीय मुल्यांकणाच्या पद्धती, गरजा, फायदे व फलनिष्पती यातून गाव विकास करण्याची सर्वांना संधी आली आहे. याचा लाभ घेऊन गाव विकास करताना येणार असल्याचे सांगितले.